डॉ. रावसाहेब कसबे

बंधु-भगिनींनो,
ज्या विषयावर मी जीवनभर मनस्वी प्रेम केले त्या तत्त्वज्ञान य़ा विषयाच्या महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेने आयोजित केलेल्या रौप्य महोत्स्वी अधिवेशनाचे अध्यक्षस्थान मला दिल्याबद्दल परिषदेच्या सर्व पदाधिकार्‍यांचा मी आभरी आहे.
सर्व ज्ञानाच्या आरंभी एक मूळ प्रश्‍न असतो आणि तो म्हण्जे या विश्‍वाची उत्‍पत्ती कशी झाली आणि विश्‍वोत्‍पत्तीपू‍र्वी काय अस्‍तित्‍वात होते ? इंग्रजीतील Metaphysics या शब्‍दाला आपण मराठीत अध्‍यात्‍मशास्‍त्र असा शब्‍द वापरतो.परंतु Metaphysics म्हणजे 'That which comes after physics’ असा आहे. म्हणून अध्‍यत्‍माचा प्रांत हा पदार्थविज्ञनानंर सुरु होणार प्रांत मानला जातो. काही विचारवंत तर
अध्‍यात्‍मशास्‍त्रात पदार्थविज्ञान किंवा सामान्य विज्ञान ह्यांच्यात अंतर्भूत असणार्‍या विषयांचाच अभ्यास असतो असे मानताना दिसतात. अध्‍यात्‍मशास्त्राच्या काही अभ्यासकांनी त्‍याला अनेक कारणांमूळे काहीसे अनाकलनीय रुप दिल्‍यामूळे तो जणू काही शास्त्रीय पद्धतीच्या विरुद्ध आहे असा समज प्रस्तृत झाला आहे. या विषयासंबंधीचे हे वास्तव अनेकांनी विज्ञानाची कधी टिंगल-टवाळी करीत तर कधी विज्ञानाच्या मर्यादावर बोट ठेवित जतन करून ठेवले आहे. आजही अनेक धर्मांचे धर्माभिमानी विज्ञान विरुद्ध अध्यात्म या संघर्षात हिरीरीने उतरलेले दिसतात. वास्तविक पाहता पारंपरिक अध्यात्म हे विश्‍वाच्या उत्पत्तीचा, त्याच्या स्वरूपाचा आणि उद्देशाचा शेकडो वर्षे विचार करीत होते. अर्थात त्याचाही विषय जडपदार्थ (Matter) आणि मन (Mind) अस्तित्त्व आणि स्वतंत्र इच्छा Existence and free will हेच होते. अर्थात विज्ञानाचेही तेच विषय आहेत. विज्ञान त्यांचा शक्य तितक्या खोलात जाऊन चिकित्सकपणे विचार करते. परंतु, विज्ञानाचे वैशिष्टय हे आहे की, त्याने जीवनाच्या अर्थाबद्दलच्या कोणत्य़ाही प्रश्‍नाला केवळ आपण एकटेच उत्तर देऊ शकतो आणि आपण दिलेले उत्तर हेच अंतिम असेल, असा दावा कधीच केला नाही.
विज्ञानाने स्वत:ला नेहमीच प्रयोगक्षम, probationary मानले. जिथे त्याला कुंठीत होण्याची शक्यता दिसली, तेथे त्याच्या अध्वर्यूंनी आपापल्या क्षेत्रातील प्रगतीसाठी आवश्यक त्यावेळी विविध ज्ञानशाखांचे सहकार्य घेतले.म्हणूनच ते सतत गतिमान राहिलेले आहे.
प्राचिन काळापासून विविध ज्ञानशाखातील शोध हे तत्त्वज्ञानाचेच क्षेत्र होते. अगदी नवव्या शतकाच्या सुरुवातीला होऊन गेलेले प्रसिद्ध अरेबियन तत्तवेते अल् कन्दी यांनी तत्त्वज्ञानाला गणिताच्या पायावर उभे करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.त्यांना तत्त्वज्ञानाला निरर्थक कल्पनाविलासातून बाहेर काढायचे होते. त्यांना तत्त्वज्ञानातील सर्व अमूर्त विचारांना ठोस वास्तवावर उभ्या असलेल्या नेमक्या युत्किवादाचे मार्गदर्शन लाभावे असे वाटत होते. त्यांनी तत्त्वज्ञानाचे सकारात्मक परिणामांच्या सर्जनासाठी अशा नियमांची स्थापना करवी म्हणून प्रयत्‍न केले.अलकंदी त्यांच्या या निश्‍चित दूरदर्शी विचारात त्यांच्या नंतर सातशे वर्षांनी येऊ घातलेल्या फ्रान्‍सिस बेकन आणि देकार्त या आधुनिक तत्त्वज्ञांच्या आगमनाची जणूकाही पूर्वीसूचनाच होती. दाहव्या शतकात होऊन गेलेल्या अल् फराबी या तत्त्वेत्त्याने पुढील काही शतके मान्यताप्राप्त ठरलेले अरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानावर केवळ भाष्याच केले नाही, तर त्यांनी वैद्यक आणि गणितसाख्या महत्त्वाच्या ज्ञानाशाखांनाही अमूल्य असे योगदान केले होते. रॉजर बेकन यांनी गणिताचे शिक्षण
त्यांच्याकडूनच घेतले होते.तत्त्वज्ञानाने आपल्या विकासकामात इतकी व्यापक दृष्टी कमावली होती की, त्या सामर्थ्याच्या जोरावर ते विविध ज्ञानाशाखात सहज संचार करू शकत होते. या संबंधीचा भरपूर तपाशील या ठिकाणी नोंदविता येऊ शकेल. परंतु, त्याची आवश्यकता नाही. तत्त्वज्ञानाजवळ जर इतकी संचारशत्त्की होती, ते जर इतके गतिमान आणि सर्वस्पर्शी होते तर मग त्याने आपली ही संचारशत्त्की आणि गतिमानता का आणि कशी गमावली ? त्याच्या हातून इतर क्षेत्रे तर सोडाच परंतु त्याची स्वत:ची खाश अशी असलेली अभ्यासाची क्षेत्रेही त्याला का सांभळता आली नाहीत ? विसव्या शतकापर्यंत त्याची अवस्था इतकी दारुण आणि निष्कांचन बनली असवी की, त्यामूळे व्हिटगेन्स्टाईन यांच्यासारख्या एक महान तत्त्वेत्त्याला "The sole remaining task for philosophy is the analysis of language " असे म्हणावे लागले. आज आपल्यासंबंधी इतर ज्ञानाशाखाचे विद्यार्थी, अभ्यासक काय म्हणतात याचा अंतमूर्ख बनून विचार करण्याची यापूर्वी कधीही नव्हती एवढी गरज आज निर्माण झालेली आहे.
तत्त्वज्ञानाची या प्रकारची अवस्था होण्याची अनेक कारणे दिली गेली आहेत. त्यापैकी काही अशी होती-ज्यांच्या ज्ञानाची प्राप्ती करायची ते नेमके काय आहे ? याबद्दल एकेकाळी कमालीचे मतभेद होते. काही ठिकाणी तत्त्व्ज्ञानाला धर्माशी एकरूप केल्याने त्यात सांप्रदायिक अभिनिवेशाचा प्रादूर्भाव झाला. आणि त्याचा नैसर्गिक विकास कुंठीत झाला. आपल्याक्षेत्राबाहेरचे वास्तव किती झपाटयाने बदलत गेले आणि आपले सगळेच विषय इतर ज्ञानाशाखांनी अभ्यासासाठी घेतले तरी त्याकडे उदासीनतेचे पाहिले गेले. ही सगळीच कारणे कमी अधिक प्रमाणत खरी असण्याची दाट शक्यता आहे. वेदोपनिषदांची चर्चा करतानाजेव्हा ब्राह्मण आणि क्षत्रिय या समाजशक्तींच्या परस्पर संबंधांच्या स्पष्टीकरणाचा प्रश्‍न येतो, तेव्हा प्रा. हिरियण्णासारखे जेष्ठ संशोधक सुद्धा ‘हा केवळ एक ऐतिहासिक प्रश्‍न असून आपल्या अभ्यासाशी त्याचा प्रत्यक्ष संबंध नाही’ असे म्हूणन तत्त्वज्ञान ज्या समाजवास्तवावर उभे असावे त्या वास्तवालाच एक तर तुच्छ मानतता किंवा त्यापासून पलायन करताना दिसतात. ऋग्वेदाच्या ‘पुरुष सूत्त्काचे’ निरूपण करताना जशी अर्थशास्त्राची मदत घेणे आवश्यक आहे तशीच ‘नासदीयसूक्तातील’ काव्य समजून घेण्यासाठी विश्‍वोत्पत्ती संबंधाची माहिती आणि आस्वादक्षमताही अर्जित करणे आवश्‍यक असते. विश्‍वोत्पत्ती हा विषय तर आता पूर्णपणे विज्ञानाच्या हातात गेला आहे. काय सांगावे कदाचित जिनिव्हा शहराजवळ ‘लार्ज हॅड्रॉन केलायडर’ या महायंत्राद्वारे सुरू असलेला प्रयोग यश्स्वी झाला तर विश्‍वोत्पत्तीबद्दल आपण खूप काही जाणू शकू. नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ फ्रान्सिस क्रिक यांनी ‘जाणीव’ हा तत्त्वज्ञानाचा विषय नसून तो विज्ञानाचा विषय आहे असे घोषित करणारे, "The Astonishing Hypothesis" या नावाचे एक पुस्तकच लिहिलेले आहे. जनुकशास्त्रज्ञ जेम्स वॅटसन यांनी तर तीन चार वर्षांपूर्वी जीवशास्त्र आणि मानसशास्त्र यातील सीमरेषाच गळून पडतील असे सांगून टाकले आहे. गेल्या २०-२५ वर्षापासून विविध ज्ञानशाखातील सीमारेषा पुसट होण्याची प्रक्रिया अधिक गतिमान झालेली आपण पहात आहोत, अनुभव आहोत. त्यामुळे कोनत्याही ज्ञानशाखेचे श्रेष्ठत्त्वाचे दावे खोटे ठरणार आहेत आणि प्रत्येक ज्ञानशाखेत या ना त्या कारणाने कमी अधिक प्रमाणत असलेली दो़षैकदृष्टी (Cynicism) आणि आत्मपूजक प्रवृत्ती (Narcicism) नष्ट होऊन एक नवे वारे संचारणार आहे.
त्यामुळे आपले कष्ट वाढतील हे खरे; परंतु आता त्यांची सवय करुन या नव्या बदलाच्या स्वागतासाठी आपण आत्मविश्‍वासाने उभे राहू याची मला खात्री वाटते.
अलिकडील काळात विविध ज्ञानशाखातील अध्वर्यू माणसाच्या अभ्यासाला सर्वधिक महत्त्व देताना दिसू लागले आहेत. वास्तविक पाहता कार्ल मार्क्स यांनी एकोणिसाव्या शतकातच सर्व ज्ञानशाखातील तत्त्वज्ञांना त्यांच्या सिद्धांतांचे एक रहस्य सांगून ठेवलेले होते आणि त्या निमित्ताने त्यांचा अभ्यास विषयही अधोरेखित केलेला होता. मार्क्स यांनी लिहिले आहे, "कोणताही सिद्धांत माणसांच्या मनाची पकड त्याच वेळी घेऊ शकतो; जेव्हा तो त्यांच्या खास मानवी हितसंबंधांचे प्रात्यक्षिक करून दाखवित असतो.ज्या क्षणी असे घडते त्याच क्षणी तो सिद्धांत पुरोगामी आणि क्रांतिकारक बनतो. परंतु एखाद्या सिद्धांताने पुरोगामी, क्रांतिकारी बनणे म्हणजे त्याने वास्तवातील गोष्टींच्या मुळाचे ज्ञान माणसांना करून देणे असते, आणि वास्तवातील गोष्टींचे मूळ हे तर स्वत:माणूसच असतो." म्हणूनच आता आणि इथून पुढेही अमूर्ताच्या चर्चेतून वितंडवाद वाढवित बसण्यापेक्षा ठोस माणसाची, त्याच्या जगण्याच्या संघर्षाची आणि त्याच्या जीवनार्थाची चर्चा अधिक मह्त्त्वाची बनली पाहिजे. त्यामुळे आपल्या विषयांच्या जुन्या मनसिकेतून आता बाहेर पडले पाहिजे. आता ज्ञानावर कोणत्याही एका व्यक्तीची, वर्गाची किंवा जातीची मक्तेदारी राहिलेली नाही. मक्तेदारीचा दावा करणारे सर्व दांभिक आपापल्या क्षेत्रात निर्मितीहीन बनत गेल्याचे आणि त्यांचा अहंकाराची वस्त्रहणेही झालेली आपण पाहिलेली आहेत. येणार काळ हा जसा राष्ट्रांराष्ट्रांच्या,सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक अभिसरणाचा असेल तसाच तो विविध ज्ञानशाखांच्या अभिसरणाचाही असपार आहे. एका दृष्टीने तेच खरे जागतिकीकरण असेल. यापूर्वी उद्‍धृत केलेल्या कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा प्रतिध्वनी पन्नास वर्षांपूर्वी प्रसिद्ध इतिहासकार इ.एच.कार यांच्या विचारात उमटलेला दिसतो. त्यांनी स्पष्टपणे नोंदवून ठेवलेले आहे की, विविध ज्ञानशाखा या एकाच प्रमुख विषायाच्या अनेक शाखा आहेत. तो प्रमुख विषय म्हणजे ‘माणूस आणि त्याचे पर्यावरण’ हा होय. माणसाचा त्याच्या पर्यावरणावर होणारा परिणाम आणि पर्यावरणाचा माणसावर होणारा परिणाम यांचा अभ्यास सर्वच ज्ञानशाखांना करावा लागतो. या अभ्यासाचा उद्देशसुद्धा एकच आहे. तो म्हणजे माणसाचे पर्यावरणावर त्याचे प्रभुत्त्व प्रस्थापित करणे हाच असतो.
असा हा ‘माणूस प्रभुत्वशाली बनण्याच्यादृष्टीने विविध ज्ञानशाखा त्याच्या अभ्यासात रममाण असणे ही एक भाग्याची गोष्ट आहे. एकेकाळी हे भाग्य ईश्‍वराला लाभले होते. परंतु अंशत: या सर्वांचा निर्माताही माणूसच आहे याकडे दुर्लक्ष होता कामा नये. त्याने अनेक गोष्टी निर्माण केल्याआणि मोडल्या. आज तो आपल्यासमोर ईश्‍वराच्या रुपात उभा आहे असे बायबलचे म्हणणे आहे. त्याच्या अभ्यास करणार्‍यांना तो अगाध, अनंत आणि विविधरुपधारी वाटतो. जगाच्या पाटीवरील अनेक धर्म म्हणजे मानवी जीवनातील आणि निसर्गातील गुढांची उकल करण्याचे मानवी मनाने अव्याहतपणे केलेले प्रय‌त्‍न आहेत. परंतु माणसाचे आपल्यासमोर असलेले आजचे Homo sapien हे रुप फार अलिकडचे म्हणजे साधारणत: तीस-चाळीस हजार वर्षांपूर्वीचे आहे. त्यापूर्वी तर तो एक सामान्‍य प्राणी म्हणून निसर्गातच त्याच्याशी संवादी असे जीवन जगत होता. याच्या उत्‍कांतीच्या प्रक्रियेत तो अधिकाधिक जटील बनत गेला. परंतु मुळात तो प्राण्याचा माणूसच का आणि कसा झाला ? या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याचा अनेकांनी प्रत्येक काळात प्रयत्‍न केला आहे. तरीही त्या प्रश्‍नाचे अनेक पदर अपही निरुत्तरीतच आहेत.
अल्‍बर्ट कामू यांच्या `The Rebel’ या ग्रंथाची सुरुवात "विद्रोह म्हणजे काय ? जो माणूस नाही असे म्हणतो: परंतु ज्याचा नकार सर्वसंगपरित्याग सूचित करीत नसतो. तो जसजसा स्वत:चा विचार करायला सुरुवात करतो.तसत्सा तो होय असे म्हणणारा माणूसही असतो.’’ या वाक्यांनी झाली आहे. कामूनी त्यांच्या याविद्रोहाच्या व्याख्येत दोन अतिशय मह्त्त्वाच्या गोष्टी सूचित केलेल्या आहेत. पकी एक माणसाला येत जाणारे आत्मभान आणि दुसरी त्यांच्या जीवन परिस्थितीला तो देत असलेला नकार. या नकाराचे स्वरुपही कामूंनी स्पष्ट केले आहे. जीवन परिस्थिती जेव्हा सहनशक्तीच्या पलीकडे जाते तेव्हाच माणूस तिच्या विरुद्ध आपला नकार नोंदवित असतो कामू असे मानीत होते की, मानवी जीवनाची विद्रोह ही एक आवश्‍यक मिती (Dimension) आहे. मानवी जीवनाच्या या आवश्‍यक अंगाला आणि त्याच्या ऐतिहासिक वास्तवाला नाकारणे निरर्थक आहे. त्यापेक्षा आपण त्यात अस्तित्वाचे तत्त्व शोधले पाहिजे. विद्रोहाची संकल्पनाही विकसित होणारी गोष्ट आहे. जुन्या काळात गुलाम मालकाविरुद्ध आणि गरिब श्रीमंताविरुद्ध विद्रोह करीत होते. आता विद्रोहाने अध्योत्‍मिक रूप धारण केलेले आहे. आता तो माणसाचा त्याच्या जीवन अस्तित्वाच्या परिस्थितीविरुद्धाचा विद्रोह बनलेला आहे, नव्हे तो खुद्द निर्मितीविरुद्ध विद्रोह झालेला आहे. कामूंनी विद्रोहाचा विचार राजकीय अंगानेच अधिक केला. कारण त्यांना विद्रोह आणि क्रांती यातील व्यवच्छेदक रेषा स्पष्ट करायची होती. कामू क्रांतीकडे नव्‍या शासनव्‍यवस्थेची स्थापाना करणारी ्कृती या अर्थाने बघत होते. तर विद्रोहाला कोणत्‍याही नियोजनशिवाय उत्स्फूर्तपणे कतीद्वारे नोंदविलेला निषेध मानीत होते. त्यामुळेच त्यांचे राजकीय विचार अराज्यव्‍यवादाच्या भूमिकेजवळ जाणारे होते.
आपण विद्रोहाच्या विचाराला राजकीय परिघाच्या बाहेर काढून जर त्याचा विचार जीवशास्त्राच्या किंवा मानववंशशास्त्राच्या दष्टिकोणातून केला तर आपल्या समोर मानवी उत्क्रांतीचा एक विशाल पट उभा राहू शकतो. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात उत्‍क्रांतीचा सिद्धांत मांडून चार्लस डार्विन यांनी माणसाकडे बघण्याची एक पूर्ण नवी दृष्टी दिली.त्यांनी माणसाचा जन्‍म ही अनंतकाळ चाललेली प्रक्रिया मानली. माणूस निसर्गात इतर अनेक प्रण्यांसोबत रहात होता. इतर सर्व प्राणी निसर्गाच्या बदालप्रमाणे स्वत:त बदल करुन घेत होते. फक्त माणूस हाच एक असा प्राणी होता, ज्याला निसर्गाप्रमाणे बदलण्याची यंत्रणा त्याच्या शरीराला लाभली नव्हती. त्यामुळे ऋतुचक्राप्रमाणे निसर्गात होणारे बदल त्याला असह्य वाटू लागले. जचाक वाटू लागले. ज्या क्षणी त्याला आत्मभान आले त्या क्षणी त्याने निसर्गाविरुद्ध विद्रोह करुन निसर्गात राहण्यास प्रत्‍यक्षकृतीद्वारे नकार दिला. ज्या क्षणी माणूसप्रणी निसर्गातून, प्राणीसृष्टी दहा लाख वर्षांपूर्वी बाहेर पडला, त्या क्षणी त्याची माणूस म्हणून जन्‍म घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. माणूस प्राण्याने माणूस होण्यासाठी निसर्गाविरुद्ध केलेला तो पहिला विद्रोह होता. माणसाचे सारे माणूसपण त्याच्या गतीमानतेवर अवलंबून आहे आणि गतिमानतेचा प्रेरणास्त्रोत त्याच्या आत्मभानातून आलेला विद्रोह आहे. माणसाने पुढील दोन पायाचे हातात रुपांतर करुन घेणे, हत्यारे निर्माण करणे किंवा त्याने अग्नीचा शोध लावणे, धरण बांधणे, शेतीचा शोध लावणे या सर्व कृती त्याने निसर्गाविरुद्ध नोंदविलेल्या विद्रोही कृती होत्या.
माणसाने प्राप्त केलेले माणूसपण, त्याने निर्माण केलेले त्याचे सामाजिक जग हे फक्त माणसाचेच कर्तृत्त्व आहे. माणूस सतत जुने संबंध मोडीत गेला आणि नवीन संबंध प्रस्थापित करीत गेला. कारण त्याला मुक्त व्हावयाचे होते. स्वतंत्र बनायचे होते. म्हणूनच प्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञ जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी "मानव जातीच्या राजकीय प्रगतीची संबंध प्रक्रिया म्हणजे मुक्त होण्याच्या कल्पनेचा क्रमश: होत जाणारा साक्षात्कार." असे म्हटलेले होते. हे सर्व खरे असले तरी, माणसाने निसर्गाविरुद्ध केलेल्या सर्व विद्रोह कृती या निसर्गाच्या सहाय्याने आणि निसर्गातच केल्या आहेत. माणूस निसर्गातून बाहेर पडला तरी
निसर्गाचा अविभाज्य भागच राहिला. त्याने निसर्गाशी संबंध अतूट होत गेले. कारण कार्ल मार्क्स म्हणाले होते, त्याप्रमाणे "निसर्ग हे माणसाचे निरिंद्रिय शरीर आहे." Inorganic body of man.

माणसाचे आजवरचे सारे कर्तृत्त्व स्वातंत्र्याच्या, मुक्तीच्या दिशेने चाललेले आहे. माणूस प्राणी निसर्गापासून स्वतंत्र झाला आणि तो माणूस बनला. धर्म, समाज, राज्य यासाख्या संस्थानी जेव्हा त्याला त्याच्या सहनशक्तीच्या बाहेर बंधनात जखडून ठेवले, तेव्हा त्याने प्रत्येक वेळी विद्रोही कृती करुन न्याय हस्तगत केला. स्वातंत्र्य हा मानवी स्वभावाचा गाभा असल्याने तो प्राप्त करण्यासाठी आणि तो टिकविण्यासाठी माणसाने अनेकदा सर्वस्व पणाला लावले आहे. अल्बर्ट कामू यांनी स्वातंत्र्याबद्दल अतिशय काव्ययम शब्दात लिहिले आहे. "वादळाच्या रथावर कोरुन ठेवलेला भयंकर शब्द म्हणजे स्वातंत्र्य होय." सर्व क्रांत्यांना कारणीभूत स्वातंत्र्य हेच तत्त्व आहे. त्याच्या अभावी विद्रोही मन न्यायाच्या कल्पनेचा साधा विचारही करणे शक्य नाही. स्वातंत्र्याच्या आकांक्षेनेच माणसाला त्याच्या जीवन अस्तित्त्वाच्या असह्य आणि अन्याय परिस्थितीविरुद्ध एक विद्रोही लढवय्या बनवले. पंरतु त्याला हिंसक मात्र बनवले नाही. स्वातंत्र्य दडपून टाकणारे हिंसक मात्र बनवले नाही. स्वातंत्र्य मागणार्‍यांचे हृदय माणसावरील, त्यांच्या स्वातंत्र्यावरील प्रेमाने ओथंबलेले असते. प्रेमाशिवाय कोणताही विद्रोही अस्तित्त्वातच असू शकत नाही. त्या प्रेमात कोणताही मतलबी हिशोब नसतो. त्यात माणसासाठी, जीवनासाठी आणि मूल्यांसाठी सर्वस्वाचा त्याग असतो. माणसाच्या आजवरच्या स्वातंत्र्य प्राप्तीचा इतिहास म्हणजे विद्रोही मनांनी केलेला सर्वस्वाचा, त्यागाचा तपशिल आहे.

मानवजातीच्या इतिहासात ज्या ज्या वेळी मानवी स्वातंत्र्यासाठी विद्रोही जनता कृतीशील झाली त्यावेळी त्या कृतीने जीवनाची सर्व अंगे प्रभावित झाली. धर्म आणि तत्त्वज्ञान, साहित्य आणि कलात, सामाजिक राजकीय संस्था आणि संघटनात आपापल्या युगाची इच्छा प्रतिबिंबीत होऊ लागली आणि आपल्या युगाची इच्छा कोणती आहे ती विद्रोही कृतीद्वारे वास्तवात कशी आणायची याची शिकवण देणारे महापुरुष मानवजातीला लाभले. पुरोहित वर्गाने कर्मकांडात जखडून टाकलेल्या, जनतेला मुक्त करण्यासाठी ‘प्लवा ह्येते अदृढा ...’ हा मंत्र गाणारे, मुंडकोपनिषदाचे कवीऋषी पुढे आले आणि त्यांनी जनतेला अंतर्मुख बनवले. ख्रिस्ती धर्माला चर्चच्या बंधनातून आणि ख्रिस्ती जनतेला धर्मगुरुच्या जाचातून मुक्त करण्यासाठी मध्युगात मार्टिन ल्युथर पुढे आले आणि त्यांनी जनतेला धर्मस्वातंत्र्य शिकवले. कालौघात भ्रष्ट,
विलासी आणि कर्मठ बनलेल्या इस्लामविरुद्ध विद्रोह करणारे सुफीसंत पुढे आले आणि त्यांनी मानवी जीवनातील अनेक रहस्ये उलगडविण्याचा प्रयत्‍न केला. ज्ञानदेव - नामदेवापासून ते तुकारामांपर्यत तसेच कबीरापासून मीरेपर्यंतचे आपले सर्व संतमंडळ हा भ्रष्ट झालेला धर्म आणि अंध:श्रद्धा धर्मरुढी यांच्याविरुद्धचा सर्वव्यापी असा विद्रोह होता. म. जोतीराव फुले यांनी सामाजिक विषमतेविरुद्ध विद्रोही भूमिका घेऊन समता प्रस्थापित होण्यासाठी प्रत्यक्ष कृती केली. विसाव्या शतकाची इच्छा मूर्तरुपात आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माची कठोर चिकित्सा केली आणि त्या शतकाच्या इच्छेला भारतीय राज्यघटनेत घटनात्मक विधिनियमांच्या रुपात शब्दबद्ध केले. आधुनिक जीवन मूल्यांवर उभ्या असलेल्या लोकशाही व्यवस्थेचे ते एक समर्थ शिल्पकार बनले. आज जगात जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने संपूर्ण मानवजातीसमोरच अनेक प्रश्‍न निर्माण केले आहेत. माहिती आणि तंत्रज्ञानातील अभूतपूर्व क्रांतीने माहिती म्हणजेच जणूकाही ज्ञान आहे असा आभास प्रसारमाध्यमे निर्माण करीत आहेत. अशा या संधिकाळात
इतर ज्ञानशाखांच्या सहाय्याने तत्त्वज्ञानाचा विकास करण्याचे आव्हान आपणापुढे आहे. ते पेलण्याचे सामर्थ्य असलेले अभ्यासक आपल्यात आहेत. ही माझ्यादृष्टीने फार आश्‍वासक अशी गोष्ट आहे. त्या सर्वांना शुभेच्छा देऊन हे भाषण संपवितो.