संमोहनात्मक पगडा पाश्चात्य तसेच भारतीय विचारवंतांवरही दीर्घ काळ राहिला. विज्ञानाला ज्या अनुभवजन्य ज्ञान पद्धतीमुळे ही मजल मारता आली. त्या़च पद्धतीचा ज्ञानाचे एकमेव साधन म्हणून तत्त्वज्ञानानेही स्वीकार केला. यामुळे तत्त्वज्ञान ही फक्त संकल्पनांच्या अभ्यासाचे अति संकुचित असे क्षेत्र ठरले. विज्ञानाच्या दारी केरकचरा साफ करणारे अकुशल सफाई कामगार अशी तत्त्वज्ञानाची दुरावस्था झाली.

सुजीवन, मुल्यविषयक प्रश्‍न ही अडगळ आहे असे वाटत असतानाच भौतिक प्रगती, तंत्रज्ञानाचा विकास यामध्ये अनुस्यूत असलेल्या प्रश्‍नांनी डोके वर काढले, त्याचबरोबर मुल्यात्मक शहाणपणाचा सुजीवनाचा प्रश्‍न अधिक तीव्रतेने सामोरा झाला. माझ्या आयुष्याचा अर्थ काय ? हा प्रश्‍न
युरोपियन तत्त्वज्ञानाच्या नवप्रबोधनात्मक मांडणीमध्ये अनेक विचारवंतानी मांडला.

आज पाश्‍चात्य जगातील युरोपातील विचारवंत तत्त्वज्ञ, नवआधुनिकतादी आणि नवप्रबोधनाचे पुरस्कर्ते तत्त्वज्ञानाकडून असलेल्या या अपेक्षाचा वारंवार पुनरुच्चार करीत आहेत. आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे निर्माण झालेले प्रश्‍न, जागतिक शांतता आणि मानवी अस्तित्वाला प्रगतीमुळे निर्माण धोका, मानव-मानव संबंधातील ताणतणाव, स्पर्धा, शोषण, चंगळवाद, भोगवादाचा अतिरेक, मानव निसर्ग संबंधातील शोषणवादी
वृत्ती निसर्गाचा ढळणारा तोल, पर्यावरणीय असमतोलाचे निर्माण झालेले प्रश्‍न, यासारख्या वर्तमानकालीन नवनवीन प्रश्‍नांना उत्तर देण्यासाठी तत्त्वज्ञानाने परीक्षणात्मक, चिकित्सक भूमिका घेऊन या प्रश्‍नांना भिडणे आवश्यक आहे. या प्रश्‍नांची मांडणी, त्यांच्या संभाव्य उत्तरांचा शोध, परंपरेच्या नवनवीन विचारातून या प्रश्‍नांची उकल होते का यांचा वैचारीक मागोवा या सर्व गोष्टी आधुनिक काळातील तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणार्‍याने केल्या पाहिजेत असे नवप्रबोधनाच्या पुरस्कर्त्याचे तत्त्वज्ञानाबद्दलचे म्हणणे आहे. सैद्धांतिक पातळीवर या प्रश्‍नांची उकल करुन, त्याला
क्रियात्मक, कृतीशील आचारणाची जोड देणे, त्याद्वारे माणसांच्या विचारांना, जाणीवांना नवीन अर्थ देऊन त्यांचे जगणे समृद्ध करणे ही नवप्रबोधनाची तत्त्वज्ञानाकडून अपेक्षा आहे.

भांरतीय संदर्भात हे वाटणे पुरातन आहे. भारतीय तत्त्वज्ञान हे प्रथमत: ‘दर्शन’ म्हणजे येथील जगणे समृद्ध करणारे आहे आणि नंतर ‘आन्विक्षिकी’ म्हणजे त्याची चिकित्सक, परीक्षणात्मक मांडणी आणि विचार करणारे आहे. वर्तमान जीवनाच्या व्यक्तिगत आणि सामाजिक सर्वंकष प्रगतीच्या समृद्धीच्या प्रश्‍नांनी सैद्धांतिक पातळीवरील चर्चा, त्याचे कृतीशील आचरण व त्यातून समाजाला मिळणारी नवी दृष्टी ह्या अपेक्षांच्या पार्श्‍वभूमीवर आपल्याला दर्शनांचा व महाराष्ट्रातील संत आणि प्रबोधन परंपरेचा विचार करता येईल.

हा असा प्रयत्‍न पूर्वी झालाच नाही असे नाही. ज्या काळामध्ये मनुष्याचे जगणेही मुष्कील होते. सतत परचक्र, युद्ध, अशांतता, मृत्यु, नैसर्गिक राजकीय आपत्ती अशा कारणांमुळे जीवनाबद्दलची सकारत्मक विचारसरणी धोक्यात होती अशा काळाताही विचा आचारांच्या सहाय्याने जीवन दर्शनाची दिशा बदलवून लोकांचे आयुष्य घडविण्याचे काम, समाज सूवास्थ चांगल्या पद्धतीने टिकवून त्याचे गुणात्मक संवर्धन करण्याचे काम भारतातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील संतांनी सातत्याने केले.

तत्त्वज्ञानाच्या प्रमाणचर्चेचे महत्त्व कमी करुन काव्याच्या, संगीताच्या, लोककलांच्या प्रभावी माध्यमातून लोकभाषेचा स्वीकार करुन महाराष्ट्रातील संतांनी त्यावेळच्या लोकांच्या जीवन विषयक प्रश्‍नांची उकल करुन त्याला प्रभावी आचरणाची जोड दिली. सामाजिक विषमता कमी करण्यासाठी उन्नत आंतरीक जीवनाचा मार्ग स्त्री शुद्रादिकांना मोकळा करुन दिला. सामान्य जनांमध्ये त्यांनी समता, प्रेम, बंधुता याबरोबर सकारत्मक दृष्टी आणि आत्मविश्‍वास जागविला., धर्म्य, सुसुख अशा राजगुह्य रोजविद्येची लोकाभिमूक मांडणी करुन सामान्यांमध्ये घडविलेले असामान्य परिवर्तन म्हणजे तत्त्वज्ञान हे तत्कालीन समस्यांचे कृतीशील समाधान या भूमिकेचा आदर्श वस्तुपाठच होता.

न्या. रानडे यांनी पंरपरेचे पुनरुज्जीवन केले नाही तर परंपरेचा प्रवाह बदलत्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, मुल्यविवेचनाने जिवंत ठेवला. स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय याच्या समर्थनार्थ त्यांनी नवभागवतवादाची मांडणी केली आणि यावर आधारलेली प्रार्थना समाजाची चळवळ उभी केली. या सर्व प्रयत्‍नांचे सूत्र म्हणजे समस्याचे कृतीशील समाधान करण्यासाठी तत्त्वज्ञानाची केलेली मांडणी व त्यानुसार आचरण हे होते. तत्त्वज्ञानाचे वर्तमान परिस्थितीच्या परिप्रेक्षता केलेले मुल्यांकन व त्याची नव मांडणी व्यक्तिगत आणि सामाजिक विचारात आणि जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणू शकते हे १९ व्या शतकातील भारतभराच्या प्रबोधनात्मक वैचारिक कृतीशीलतेमुळे पुन्हा सिद्ध झाले.

महाराष्ट्रात ह्या प्रबोधनाच्या चळवळीने केवळ न्या. रानडयांचाच मार्ग स्वीकारला असे नाही. तिने अनेक नवनव्या वाटाही चोखाळल्या वेदान्ताची
पुर्नमांडणी करण्यापासून ते वेदांत नाकारण्यापर्यंतच्या अनेक पर्यायांनी तत्कालीन समाज व व्यक्ती जीवनाच्या जाणीवा समृद्ध केल्या. बुद्धांच्या तत्त्वज्ञानाच्या समृद्ध वारसा नवभारताच्या स्वातंत्र्य समतेसाठी योग्य वाटल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध तत्त्वज्ञानाचे मुल्यांकन करुन विज्ञाननिष्ठ, समताधारित समाजासाठी सार्वकालीक असे बौद्ध नीतीचे विवेचन केले. बुद्धांचा दु:खवाद, कर्म सिद्धां, निर्वाण याची परंपरागत मांडणी नाकारली.

गोपाळ गणेश अगरकरांनी संपूर्ण परंपरा त्याज्य आहे आणि विज्ञाननिष्ठ समाजातील अनुभव आणि तर्कांचेच किंवा विवेकी दृष्टीनेच जीवन जगले पाहिजे असे अत्यंत घणाघाती पद्धतीने सातत्याने मांडले. त्यांचा ‘सुधारकवाद’ , ‘अज्ञेय वाद’ ‘विवेकवाद’ यामुळे समाजाचे प्रबोधन झालेच आणि अनेकांच्या वैचारिक विश्‍वाचे ते प्रेरणास्थानी झाले.

१९ व्या शतकातील महाराष्ट्राच्या सर्वच विचारवंत वर्तमानाच्या संदर्भात पंरपरेचे सिद्धांत कृतीशीलतेच्या दृष्टीने अवलोकन केले आणि आपल्या लेखनातून ते मांडले. महात्मा जोतिबा फुले, पंडिता रमाबाई, लोकहितवादी, लोकमान्य टिळक अशी कितीतरी विचारवंतांची कामगिरी आपल्या डोळ्यांसमोर येईल.

जोपर्यंत मानवी समाज जिवंत आहे. तोपर्यंत वर्तमान कालीन प्रश्‍न हे राहणारच या प्रश्‍नांची मांडणी आणि कृतीशीलतेतून बदल हे तत्त्वज्ञानाचे कार्य ही तत्त्वज्ञानाला नवजीवन दिशा आणि प्रवाहीपणा देईल. याची प्रेरणा त्या त्या समाजाच्या तत्त्वज्ञानात्मक, सांस्कृतिक वारशामधेही असू शकेल. पण हे भूतकाळाचे ओझे नसेल, भूतकाळाचे पुरातत्त्वरुपातील प्रीदर्शन नसेल. त्याची वर्तमानकालीन जगण्याशी जोडून दिलेली परामर्शात्मक चेतना असेल. हे ही असले पाहिजे असे नाही. संपूर्णपणे नवी प्रेरणाही त्यामध्ये येऊ शकेल. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा
परिणाम विचारांच्या खुलेपणातही होणारच. होत ही आहे. असे करण्याने तत्त्वज्ञान हे मृत डबके न बनता जिवंत प्रवाही धारा बनण्याचे आश्वासन मिळू शकते. भौतिक प्रगतीच्या संदर्भात सुजीवन विषयक, मुल्यविषयक, माणसाला माणूस किंवा त्याहीपेक्षा श्रेष्ठ असण्याच्या सैद्धांतिक व कृतीशील मार्गाच्या नवजीवन वाटा चोखाळणे हे तत्त्वज्ञानाच्या जिवंतपणाचे व प्रगतीचे द्योतक असेल.

मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाने या दृष्टीने भारतीय व पाश्‍चात्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाची एम. ए., एम. फिल व विविध सर्टिफिकेट,
डिप्लोमा कोर्सेस आखणी केली. सैद्धांतिक विवेचनाबरोबर प्रॅक्टीकल चा समावेश केला. पतंजलींच्या योगसूत्रांचा अभ्यास वर्तमानकालीन समस्यांच्या संदर्भात सैद्धांतिक पातळीवर लोकांसमोर ठेवला. योग आसन प्राणायामाम्ध्ये प्रविण असलेले अनेक जण या विचार व्यूहाचा परिचय करुन घेण्यासाठी दरवर्षी प्रचंड प्रतिसाद देतात. १४ वर्षानंतरही हा ओघ कायम आहे. हीच दृष्टी ‘जैन, बौद्ध, वल्लभ - वेदांत’ यांच्या अभ्यासातही ठेवून त्याचे विविध पातळीवर कोर्सेस चालवले. आज या तत्त्वज्ञान दर्शन परंपरेच्या एम. ए. व पीएचडी साठी अनेकजण स्वेच्छेने आनंदाने अभ्यास करत आहेत. भारतीय तत्त्वज्ञान आणि पाश्‍चात्य तत्त्वज्ञान यांचा एकत्र विचार त्यातील पद्धतशास्त्रीय वैचारीक सारखेपणा व भेद याच्या परामर्शाने एक वैचारीक उदारमनस्कता रुजविण्याच्या विभागाच्या प्रयत्‍नाला बर्‍याच मोठया प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळतो. यातून पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाबद्दल ही आवड निर्माण होते असाही अनुभव विभागाने घेतला आहे.

भारतासारख्या बहुधार्मिक देशामध्ये धार्मिक सांमजस्य हे फार महत्त्वाचे आहे. शांतता व सुव्यवस्था यासाठी परस्परांचा आदर, प्रेम इ. निर्माण व्हावे म्हणून (Communal Harmony & Peace ) ह्या कोर्सेसमध्ये विविध धर्माचे तत्त्वज्ञान, वर्तमान समस्या आणि सुजीवन ह्यावरही अनेक विचारवंताना बोलावून विचार केला जातो.

तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाचे जीवन स्वत:चे आणि समाजाचे अधिक चांगलेपणाने समजते, ह्याचा माझ्या वर्तमान जगण्याशी संबंध आहे याचे भान शिक्षक व विद्यार्थी या दोघांना झाले की तत्त्वज्ञान शिकणे ही आंनदयात्रा बनते. आपल्याला प्रश्‍न पडतात त्याचे स्वरुप स्थानिक तसेच जागतिक असू शकते, याची उत्तरे शोधणे हे सर्व संस्कृतीमध्ये सतत चालू असते ह्याचे भान आले म्हणजे ही एक नवी दृष्टी मिळते. ह्याचा उपयोग
भारताच्या भावी नागरीकाला सदैव आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर होत राहिलच. या आत्मविश्वासाने तत्त्वज्ञानोच विद्यार्थी नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करु शकतील. तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी उत्तम प्रकारे IAS, IFS, IPS या परिक्षामध्ये यश संपादन करु शकतात असे आमच्या काही विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. गरज आहे परिश्रमाची योग्य दृष्टीची आणि कृतीची. आज मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागात १७५ च्या जवळपास पदविकेच अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. हे चित्र बरेच आशादायी आहे.

म. त. प. च्या ‘रौप्या’कडून ‘सुवर्णा’कडे या अधिवेशनाच्या निमित्ताने सुरु होणार्‍या वाटचालीत पहिल्या वळणावरच मी सर्वांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा मी एक ज्येष्ठ सदस्य असल्यामुळे माझ्याकडे डॉ. ज. रा. दाभोळे (म. त. प. चे ज्येष्ठ संस्थापक सदस्य व या अधिवेशनाचे प्रमुख समन्वयक) यांनी एक लांबलचक प्रश्‍नावली पाठवून दिली. त्यांच्या सर्वच प्रश्‍नांना समर्पक उत्तरे द्यायची झाल्यास मला एक आत्मचरित्रात्मक असा खूप प्रदीर्घ लेखच लिहावा लागेल. ते आता शक्य होईल असे वाटत नाही. काही प्रश्‍न तर असे आहेत की, ज्यांना मी उत्तरे देऊच शकणार नाही. त्यांचे सर्व प्रश्‍न एकत्रित केले तर त्यांची अपेक्षा मी प्राधान्येकरुन तीन मुद्यावर लिहावे अशी असावी असे मला वाटते. ते तीन मुद्दे असे १) तत्त्वज्ञानाच्या प्रवासातील माझा स्वत:चा बौद्धीक विकास, २) तत्त्वज्ञान पारंपरिक आणि आधुनिक या संदर्भातील माझे विचार आणि ३) म. त. प. ची आजवरची वाटचाल आणि भविष्याबद्दलच्या अपेक्षा. या मुद्यांनाही मी ओझरता स्पर्श करणार आहे. फार खोलात जाऊन चर्चा करता येणार नाही. खरं म्हणजे हे एक छोटेसे आत्मपरिक्षणच होणार आहे. आपण सर्वांनीच हे असे आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे.

१९९५ मध्ये पुणे येथे झालेल्या अधिवेशनप्रसंगी स्मरणिकेत मी असं लिहिलं होतं की, म. त. प. ला जर बौद्धीक आणि तेही तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात काही जागरण घडवून आणायचे असेल तर एक मोठा प्रदीर्घ असा प्रवास अंगिकारावा लागेल. सर्व मराठी जनमानसात एक वैचारिक क्रांती घडवून आणायची असेल खुद्द स्वत:ला खूप चिंतन करावे लागेल. आणि ते चिंतन समाजापर्यंत न्यावे लागेल. खरे म्हणजे वैचारिक क्रांती ही क्रांती असतच नाही, ती उत्क्रांती असते. हे लक्षात घेतल्यास मला अभिप्रेत असलेला ‘प्रदीर्घ प्रवास’ कसा अटळ आहे हे लक्षात येईल. अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्रय, धार्मिक कर्मकाण्ड आणि पारंपरिकतेचा पगडा यांनी ज्या समाजाची वीण घटट (?) झालेली आहे, त्या समाजात म. त. प. ला अभिप्रेत असणार्‍या परिवर्तनाची गती गोगलगायीच्या गतिपेक्षा धिम्मी होत राहते. त्यामुळे त्या प्रदीर्घ प्रवासाची दीर्घता आणखीनच दीर्घ होत जाते. पण असे असले तरी म. त. प. आपल्या प्रवासाची व्याप्ती आणि गतिमानता निश्‍चितच वाढवू शकते, असा माझा विश्‍वास आहे. नमनाला घडाभर तेल न घालता उद्‌धृत तीन मुद्यांकडे मी वळतो.

माझे प्राथमिक, माध्यमिक, पदवीपूर्व व पदव्युत्तर शिक्षण हे अतिशय प्रतिकूल अशा परिस्थित झाले, पण मला त्याची खंत वाटत नाही. उलट त्यातील विविध अनुभवांनी एक वेगळीच खुमारी आली. मात्र त्यात समाधानाची एक फार मोठी गोष्ट होती, ती अशी की माझ्या आईवडिलानी मला चांगल्या बुद्धीचा वारसा दिला होता. शिक्षकांनी व प्राध्यापकांनी माझ्यावर जे काही चांगले संस्कार केले त्यामुळे त्या वारशाला चांगला फुलोरा देण्याचा मी यशस्वी प्रयत्‍न केला. सर्व शैक्षणिक प्रवासात सर्व स्तरांवर मी माझ्या सहाध्यायांमध्ये पहिल्या क्रमांकाचा विद्यार्थी म्हणून वावरलो. विद्यार्थी दशेतला फार मोठा कालखंड चरितार्थासाठी अर्थार्जन करण्यात गेला. परीक्षांमधून मी प्रथम क्रमांकचे यश मिळवले तरी अध्ययन मात्र मर्यादित असेच राहिले. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासासाठी नेमका तत्त्वज्ञान हाच विषय का निवडला याचे प्रामाणिक उत्तर असे आहे की, इंटर आर्टस्‌ला तर्कशास्त्र विषयात मी विद्यापीठात पहिला आलो होतो. त्यामुळे बी. ए. च्या दोनही वर्षांकरीता एक स्कॉलरशिप मिळणार होती. त्या स्कॉलरशिपची एक अट अशी होती की तिच्या धारकाने बी. ए. साठी ‘तत्त्वज्ञान ( Special ) ’ या विषयांची निवड केली पाहिजे. त्यामुळे माझ्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता. हे असे असले तरी मी आपल्यासाठी हेही लिहिण्याचे थोडे धाडस करतो की, त्या वेळपर्यंत माझा पिंडही
काहीसा चिंतनशील प्रवृत्तीचा असा घडत आलेला होता. माझ्यावर तसे संस्करही झालेले होते. माध्यमिक शिक्षणासाठी सांगली हायस्कूलमध्ये असताना मी कै. संतराम पाटील (लाल निशाण गटाचे संस्थापक) यांच्या बौद्धीकांना हजर रहात असे. त्यांच्याकडून माझ्यावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव विद्यार्थी दशेतच झालेला होता. त्यांनी माझ्या व्यक्‍तित्वाला सामाजिक जाणिवाचा आणि बांधलकीचा पहिला आयाम दिला; हे मी मुद्दाम आवर्जून लिहितो. भारतीय समाजरचना आणि वर्गीय शोषण हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते. आता वरिष्ठ पत्रकार म्हणून ख्याती पावलेले श्री. गोपाळ पटवर्धन यांच्या संपर्कातही मी आलो होतो. तेही डाव्या विचारसरणीचे .त्यांनीही माझ्यावर अनेक प्रकारचे संस्कार घडविले.
Peoples' Age या कम्युनिस्ट पार्टीच्या मुखपत्राचा मी नियमित वाचक होतो. म. गांधींच्या ‘चले जाव’ चळवळीनेही त्यावेळेस आमची मने खूप भारावून टाकली होती. शालेय अभ्यासाव्यतिरिक्‍त मी त्यावेळेस खूप वाचत असे. त्या चळवळीतील सत्याग्रही आणि त्याच्या कुटुंबियांवर आपल्याच पोलिसांकरवी खूप अत्याचार होत असत. त्या बातम्या वाचल्या की, आम्हा मुलांची डोकी भडकत असत. नाना पाटलांच्या प्रतीसरकारच्या बातम्यांनी मात्र रोमांच उठत असत.

मी मॅट्रिकच्या वर्गात असताना भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण तो आनंद निर्भेळ नव्हता. देशाच्या फाळणीचे दु:ख असह्य होते. महात्मा गांधींनाही ते गिळावे लागले, तर मग आपली काय कथा? नौखालीतील हत्याकांड, खुद्द गांधींजीची ३० जाने. ४८ या दिवशी झालेली हत्या, महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेली जाळपोळ या सर्व गोष्टींनी माझ्या वयाचे सर्वजण मानसिकदृष्टया उद्‌ध्वस्त झालो होतो. मुंबई विद्यापीठाची पहिलीच परीक्षा म्हणून एक वेगळेच दडपण होते. त्याही परिस्थितीत अभ्यास केला आणि परीक्षाही दिली. पहिल्या श्रेणीत अपेक्षेपेक्षाही जास्त गुण घेऊन पास झालो. पण परिस्थितीच अशी होती की निर्माण झालेलं उच्चशिक्षणाचं स्वप्न कोरेगावच्या तिळगंगेत विसर्जित झालं. आणि अनिच्छेनं कारकुनीचा मार्ग स्वीकारला. पुढील तीन वर्षे नोकरीवर भटकंती केली. या सर्व काळात मी खूप अस्वस्थ होतो. माझ्या भोवताली माझ्यासारखे अनेक लोक कारकुनाचंच जिणं जगत होती. त्यात त्यांचं काही फारसं चुकत होतं असेही नाही. पण मी मात्र अस्वस्थ होतो, असमाधानी होतो. याच काळात माथेरानला असताना मी एक महत्त्वाचा निर्णय केला आणि तो म्हणजे शिक्षणक्षेत्रात काम करण्याचा. तिथं मी एक छोटीशी रात्रीची शाळाही सुरु केली. या काळात मला अनेकांनी खूप खूप मदत केली. अनेकांचा प्रभावही कारणीभूत झाला. त्या सर्वांचा उल्लेख मी विस्तारभयास्तव करु शकणार नाही. पण त्यातील एका व्यक्‍तीचा उल्लेख मी जर केला नाही तर ते अक्षम होईल. ती व्यक्‍ती म्हणजे शिक्षणाचे अतिशय महत्त्वाचे काम करणारे प्राचार्य शां. य. गव्हाणकर ही होय. माझा त्यांचा सहवास १९५१ मध्ये घडला. त्या दिशेचा पहिला टप्पा म्हणून मी उच्चशिक्षणाकडे वळलो. खूप खटपट केली आणि पुण्याला बदली मिळवली आणि चार वर्षांच्या खंडानंतर स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. कोरेगावच्या तिळगंगेत विसर्जित केलेले स्वप्न वर येऊन परत साकार झालेलं होतं. तुकारामाची बुडलेली गाथा इंद्रायणीतून वर आली, पण ती एक वस्तुस्थिती होती.

तत्त्वज्ञान हा विषय का निवडला हे सांगण्याच्या निमित्ताने हे लेखन थोडसं लांबलं. तो विषय निवडला यार आपण काही चूक केली असं मला कधीच वाटलं नाही. आजही तसं वाटत नाही. आजवरचा सर्व प्रवास वाचन, मनन, चिंतन आणि थोडफार लेखन यांनी पूर्ण भरुन गेला. अध्यापन केलं. अक्षरश: हजारो विद्यार्थी या प्रवासात भेटले. काही जवळ राहिले, पण असंख्य विद्यार्थी - विद्यार्थीनी पाखरासारखे उडून गेले. त्यांचे पंख थोडेफार बळकट करण्याचे समाधान लाभले. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातच आज जे कार्यरत आहेत त्यांच्या विकासात तर एक आगळंच समाधान मिळत राहिलं.

आणखी एका विचाराला स्पर्श करतो, कारण आपल्या शिक्षणपद्धतीच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. स्वानुभवाचा आधार घेत घेतच जरा लिहतो यावरुन वाचकांची क्षमा मागतो. खरं म्हणजे एम. ए. होईपर्यंत मी एक परीक्षार्थीच होतो. उत्तम स्मरणशक्ती आणि भाषिक अभिव्यक्ती माझ्याकडे होती. त्यामुळे त्यांचे यश हे माझ्या विद्या संपादनाचेच यश असे समजले गेले. मला तर सुवर्णपदकही प्रदान केले गेले होते. त्यामुळे मी उत्तम अध्यापन करीन असे समजले जाऊन मला महाविद्यालयातले अध्यापक पदही बहाल केले. प्रत्यक्ष व्याख्यांनाना सुरुवात केली अन्‌ माझं विद्यार्थीपण सुरु झालं. कै. प्रा. वाडेकर असं नेहमीच म्हणत असत की, "You begin to learn your subject only when you begin to teach it." मी तर्कशास्त्र आणि तत्त्वज्ञान शिकवायला सुरुवात केली अन्‌ माझं त्या विषयातलं विद्यार्थीपण सुरु झालं. तर्कशास्त्र शिकवायला सुरुवात झाली आणि मला हे प्रकर्षाने जाणवायला लागलं की आपण हे जे तर्कशास्त्र शिकवतो आहोत ते अरिस्टॉटलने २३०० वर्षांपूर्वी मांडलेले आणि त्याचा पायाभूत आधार घेऊन थोडसं सुधारलेलं ते Traditional Logic च होतं आणि आजमितीस ते कोणीही वापरत नाहीत. आपण आधुनिक तर्कशास्त्र जे Frege, Russell आणि Whitehead यांनी विकसित केले आहे ते का शिकवू शकत नाही. हा विचार मला भेडसावू लागला. मला हेही जाणवले की, हे तर्कशास्त्र माहीत नसेल तर २० व्या शतकांतील ज्ञानाच्या व तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील नवीन प्रवाह आपणास, म्हणजेच नवीन पिढीस आकलन होऊ शकणार नाहीत. मी स्वत:हून पहिली काही वर्षे आधुनिक तर्कशास्त्राचा अभ्यास केला आणि १९६२- ६३ मध्ये पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात त्यावर पहिल्यांदा एक अभ्यासक्रम शिकवला. मला १९६४ मध्ये डॅनफोर्थ रीसर्च शिष्यवृत्ती मिळाली आणि तीन वर्षे मी रॉचेस्टर (USA)
विद्यापीठात अध्ययन आणि संशोधन यात व्यतीत केली. त्यावेळी आपल्याकडे जे विषय शिकवले जात नव्हते त्या विषयांचे अभ्यासक्रम मी अभ्यासले. फ्रेग, मूर, रसेल, विट्‍गेन्स्टाईन, ऑस्टिन, राईल यांच्या विचारधाराची ओळख चिकित्सक दृष्टिकोनातून करुन घेतली. माझे तत्त्वज्ञानाचे क्षितीज खूपच विस्तारले. थोडीफार संशोधनात्मक दृष्टीही प्राप्त झाली. थोडक्यात म्हणजे मी परीक्षार्थी राहिलो नाही. रॉचेस्टार विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागाने माझ्यातील विद्यार्थीपणाला आव्हान दिले आणि मी ते माझ्या भवितव्याचे आव्हान म्हणून स्वीकारलेही. त्या तत्त्वज्ञानविभागात डॉ. लुई व्हाईट बेक यांच्यासारखा ख्यातनाम प्राध्यापक होता हे पाहून मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कान्ट’ या तत्त्ववेत्याचे अध्ययन केले. त्यामुळेच मला २० व्या शतकातील तत्त्वज्ञानाची आव्हाने स्वीकारण्याचे थोडेफार बळ प्राप्त झाले आहे. हे बळ माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे कामही मी केले आहे. नवीन तर्कशास्त्राच्या अध्ययनामुळे माझ्यात झालेला बदल विलक्षण होता. पूर्वी मी शंकराचार्य आणि ब्रॅडली यांचा खूप चाहता होता. पण आज तसे राहिले नाही. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रांतील प्रकांड पंडित म्हणून त्यांच्याबद्दलचा आदर कायम आहे, पण त्यांच्या तत्त्वज्ञानाचा मी आज समर्थक होऊ शकणार नाही. माझ्यामध्ये घडलेला बदल हा पाश्‍चात्य शिक्षण पद्धतीने घडवून आणलेला होता. त्या पद्धतीत परीक्षांचे अवडंबर नाही, पण विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सातत्याने होत राहते. विशेष म्हणजे प्राध्यापक आणि विद्यार्थी हे दोघेही आपापल्या विषयात अद्यावत कसे राहतील याची काळजी घेतली जाते. शैक्षणिक स्वायत्तता म्हणजे काय हे मला तिथे कळले. आपल्याकडे मोठे तत्त्ववेते का निर्माण होत नाहीत याचे हे उत्तरही आहे. याला काही अपवादही आहेत, पण त्या अपवादांचे श्रेय आपल्या शिक्षणपद्धतीचे नसून त्यांच्या त्यांच्या वैयक्‍तिक कर्तबगारीचे आहे.

तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात १९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत आणि २०व्या शतकाची एक दोन तीन दशके तत्त्ववेत्यांनी ईश्‍वर, विश्‍व आणि मानव यांच्यावर लक्ष केंद्रित करुन आपापल्या पराभौतिक प्रणाली (Metaphysical systems) निर्माण करण्यात रस घेतला. रसेल यांचा केवळ चिद्‌वाद हे त्यातील शेवटचे आविष्कार होत. या सर्व प्रणाल्या संपूर्ण अस्तित्वाला गवसणी घालणार्‍या बौद्धिक विमर्शणाचा परिपाक होत असा दावा या प्रणाल्यांचे कर्ते आपापल्या प्रणालीच्या संदर्भात करत होते. गेल्या २५०० वर्षांत पाश्‍चिमात्य देशात प्लोटोपासून ते रसेलपर्यंत अशा अनेक प्रणाल्या प्रस्तृत करण्याचा मोह तत्त्ववेत्त्यांना पडलेला आहे. अशाच तर्‍हेचा अभिप्राय आपण सर्व भारतीय दर्शनांच्या बाबतीत व्यक्त केल्यास फारसे वावगे ठरु नये. या सर्वांनीच अंतिम सत्ता, ईश्‍वर, जागत्‌, आणि मानवाचे आत्मे याविषयी आपापली मते व्यक्त करुन पराभौतिकेचे दालन खूपच श्रीमंत केले आहे. यातील प्रत्येक वादाची चिकित्सक समीक्षा तत्त्वज्ञानाच्या इतिहासात अनेकांनी केली आहे हे सर्वश्रुत आहे.

१६व्या शतकापासून विज्ञानाचा प्रवास सुरु झाला. त्याचा देदिप्यमान प्रगतीमुळे आजही आपण विस्मयचकित झालेले आहोत. कोपर्निकस, जोहाना केपलर, गॅलिलिओ, देकार्त, न्यूटन इ. अनेक शास्त्रज्ञ आणि सरतेशेवटी आईन्स्टाईन यांच्या योगदानामुळे आज आपण असे म्हणू लागलो आहोत की, विश्‍वाचे ज्ञान म्हणजेच - वास्तवाचे ज्ञान- आपणास विज्ञान देते; तत्त्ववेत्यांची पराभौतिकी नव्हे. पाश्‍चात्त्य देशांच्या विज्ञान प्रसृत होण्याच्या पूर्वीही पराभौतिकीवर संशयवादी विचारवंतानी हल्ले केलेले आहेत. एका पराभौतिकी रचनेवर हल्ला करुन ती नाकारणे आणि त्याजागी दुसरी एखादी पराभौतिकी मांडणी करणे म्हणजे पराभौतिकेवरचा हल्ला नव्हे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. पराभौतिकी अशी ज्ञानशाखाच असू शकणार नाही अशी भूमिका घेणे म्हणजेच पराभौतिक रचनेलाच आक्षेप घेणे होय. तत्त्वज्ञानाच्या इतिहासात असे आक्षेपक निर्माण झालेले आहेत.
या संदर्भात पायर्‍हो, सेक्स्टस एम्पिरिकस, मॉन्तेन्य, शरॉं, डेव्हिड ह्यूम आणि कान्ट हे ख्यातनाम आहेत. विसाव्या शतकातील तार्किक प्रत्यक्षार्थवादाचे (Logical Positivism) समर्थक (एयर, कारनॅप इ.) आपल्याला चांगलेच परिचित आहेत. ते सर्वच पराभौतिकाचे कटर विरोधक आहेत, पण या सर्वांचे विरोध वादग्रस्त ठरले आहेत. भारतीय दर्शनांच्या बाबतीत काहीच बोलायला नको अशी परिस्थिती आहे. संशयवादाला फारसा थाराच नाही. बावा वाक्यं प्रमाणं या न्यायाने सर्व तत्त्वचिंतन झाकोळले गेलेले. वैध युक्तिवादांचा कुठेही वापर नाही. यावर खूप लिहता येणे शक्य आहे, पण विस्तारभयासाठी हे आटोपते घेणे आवश्यक आहे.

पाश्‍चात्य पराभौतिक प्रणाल्या काय, किंवा भारतीय दर्शने काय- खरा प्रश्‍न असा आहे की या सर्वांपैकी कोणती स्वीकारार्ह आहे ? असे काही निकष आपल्याकडे आहेत का की ज्यायोगे आपण केवळ एका प्रणालीचा स्वीकार करुन इतरांचा अव्हेर करु शकू? दुर्दैवाने अशी परिस्थिती आजमितीस तरी नाही. उलट, विज्ञानाच्या रेटयामुळे पराभौतिकी नकोच असे आता अनेकांना वाटायला लागले आहे. पण हे नुसते वाटणे वेगळे आणि त्यासाठी निखालस अचूक युक्तिवाद देणे वेगळे. विज्ञानाच्या क्षेत्रात आज जे काही कार्य चालू आहे त्यावरुन पराभौतिकीलाच उच्चाटन देता येईल, असे दिसत नाही.

पण यामुळे निराश होण्याचे कारण नाही. मी वर भाग (१) मध्ये आधुनिक तर्कशास्त्राच्या अध्ययनाची जी आवश्यकता प्रतिपादली आहे तिकडे वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो.

आधुनिक तर्कशास्त्रातील, पाहिजे असेल तर गणिताच्या तत्त्वज्ञान क्षेत्रातील म्हणा, एक नवे संशोधन असे आहे की, कोणतीही निगाम प्रणाली एकाच वेळेस परिपूर्ण व सुसंगत अशी असू शकत नाही. ती जर परिपूर्ण असेल तर त्या प्रणालीत हमखास एकतरी विसंगती असणारच. आणि अशी प्रणाली जर सुसंगत असेल तर ती परिपूर्ण असूच शकणार नाही. हे संशोधन १९३१ मध्ये कुर्ट शोडेल याने रसेलच्या Principia Mathematica या ग्रंथावर प्रसिद्ध केलेल्या संशोधन निबंधामुळे शक्य झाले आहे. आता तत्त्ववेत्त्यांच्या पराभौतिकी प्रणाल्याकडे किंवा दर्शनाकडे आपण तर्कशास्त्रीय दृष्टिकोनातून पहायचे ठरवले तर त्या सर्व निगामी प्रणाल्यांच्या प्रारुपात मांडल्या गेल्या पाहिजेत. त्यांना त्याशिवाय ज्ञानाचा दर्जाच प्राप्‍त करुन देता येणार नाही. त्या तशा मांडल्या गेल्या नसतील तर त्या निगामी प्रणालीच्या प्रारुपात मांडता येतात की नाही याचा आपण शोध घेतला पाहिजे. तसे करता येत नसेल तर त्यांना ज्ञान असे समजताच येणार नाही. समजा, जर असे एखादे भारतीय दर्शन किंवा पाश्‍चात्त्य तत्त्ववेत्याची पराभौतिक प्रणाली आपण निगामी प्रारुपात मांडू शकलो तरी त्यात विसंगती निर्माण होणारच. कारण कोणतेही दर्शन वा पराभौतिकी प्रणाली ही ज्यात्याच परिपूर्ण असल्याचा दावा करीत असते. मला असे वाटते की कान्टला हेच म्हणायचे होते, पण आधुनिक तर्कशास्त्राची आयुधे त्यावेळेस विकसित झालेली नव्हती त्यामुळे त्याला ते नीटसे मांडता आले नव्हते. अगदी थोडक्यात सांगायचे म्हणजे पराभौतिकी ही तर्कशास्त्रीय दृष्टिकोनातून अशक्यप्राय आहे. विश्‍व आणि मानव यांचे सत्य रुप काय आहे हे सांगायला विज्ञान पुरेसे आहे. तत्त्ववेत्त्यांनी ती जबाबदारी स्वीकारायचे कारण नाही. पराभौतिकीच्या कक्षेत पडणार्‍या ईश्‍वर, जगत्‌, आत्मा, मन या व अन्य अनेक संज्ञांचे विवेचन हे सर्व ‘प्रामादिक भाषा व्यवहार (Psuedo Discourse) या सदरात मोडणारे असते. कुर्ट शोडेल यांच्या प्रमेयामुळे पराभौतिकीवर जो परिणाम झाला आहे, त्याहीपेक्षा अधिक परिणाम विट्‌गेन्स्टाईन, ऑस्टिन, गिलवर्ट राईल यांच्या भाषिक विश्‍लेषण पद्धतीनीही घडला आहे. त्यांची विवेचन मात्र विवाद्य ठरली आहेत आणि एवढयासाठीच मला कुर्ट शोडेलच्या प्रमेयाचे अधिक महत्त्व जाणवते. अगदी अलीकडे डेरिडाच्या प्रभावातून पोस्ट मॉडर्न क्रिटिकल थेअरी पुढे आली आहे. त्या विचारधारा विविध चिंतकांनी विविध प्रकारे मांडल्या आहेत. त्या सर्वांना एकत्रितपणे
‘विरचना कार्यक्रम’ (Deconstruction Programme ) असे म्हणता येईल. प्राचीन काळापासून मानवी मनावर अधिसत्ता गाजवणार्‍या धार्मिक, पराभौतिक आणि नैतिक संकल्पनांचीच ती मोडतोड आहे. आपणासही भारतात हेच काम करावे लागणार आहे.

वरील सर्व विवेचन लक्षात घेतल्यास महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेची जबाबदारी किती मोठी आहे याची कल्पना येईल. महाराष्ट्रातील जनतेवरही अजून अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्रय, पारंपरिक रुढी आणि नीति यांचा प्रचंड पगडा आहे. लेखनावाचनाच्या निरक्षतेपासून ते तात्त्विक साक्षरतेचा प्रवास, मी अगोदर म्हटल्याप्रमाणे, खरेच प्रदीर्घ आहे आणि तो अनेक अडचणींनी कठीणही बनलेला आहे. समाजपरिवर्तनासाठी आपणास मराठी भाषिक समाजाशी मोठया प्रमाणावर संपर्क वाढवावा लागेल. त्यासाठी म. त. प. ला विविध प्रकारचे सर्व महाराष्ट्रभर उपक्रम घ्यावे लागतील. सध्या वर्षातून आपण एकदाच भेटतो. पाच- दहा व्याख्याने होतात, थोडीफार चर्चा होते, पाचपंचवीस निबंध वाचले जातात. पुणे विद्यापीठाचे ‘परामर्श’ आहे म्हणून त्यातले काही प्रसिद्धही होतात, पण त्या पलीकडे काही घडत नाही. महाराष्ट्रात सध्या जवळजवळ ७५० महाविद्यालये आहेत. या प्रत्येक महाविद्यालयात आपणाला पोहोचता आले पाहिजे. महविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व स्थानिक जनतेसाठी व्याख्याने, परिसंवाद, चर्चा यांचे प्रमाण खूप वाढले पाहिजे. जनमानसावर असलेला रुढी, परंपरा, धर्म यांचा पगडा नाहीसा होण्याच्या दृष्टीने नीती, सामाजिक न्याय, मानवी हक्क, भारतीय राज्यघटना, स्त्री स्वातंत्र्याचे प्रश्‍न, भ्रष्टाचार, विधिमंडळे व लोकसभा यात चर्चिले गेलेले प्रश्‍न आणि इतर अनेक विषय यांचा अभ्यासपूर्ण उहापोह झाला पाहिजे. प्रश्‍नोत्तरे घडवून लोकांचे शंकानिरसन झाले पाहिजे. म. त. प. च्या सदस्यांची संख्या खूपच वाढली पाहिजे. थोडक्यात म्हणजे संपूर्ण वर्षभर आपली कृतीशीलता प्रकट झाली पाहिजे.

यासाठी येती काही वर्षे, कदाचित दशके, युवाशक्‍तीलाच आवाहन करावे लागणार आहे. युवाशक्‍ती हेच आपले लक्ष्य असले पाहिजे. लोकसंख्या विशारदांचे वस्तुस्थितीवर आधारलेले असे एक भाकीत आहे की आणखी एका दशकात म्हणजे २०२० च्या दरम्यान आपल्या समाजातील युवकांची संख्या ४० - ५५ टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. आर्थिक विकासासाठी या युवाशक्‍तीचेच योगदान त्यावेळेस महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे भाकित आपण नजरेआड करुन चालणार नाही. आर्थिक परिवर्तनाबरोबरच सामाजिक जीवनाची गुणवत्ताही उंचावणे अतिशय आवश्यक आहे. जीवनाची गुणवत्ता वाढवणे याचा अर्थच असा आहे की जीवनाच्या सर्व अंगांचे परिवर्तन घडवून आणणे आणि त्यासाठी तात्त्विक अधिष्ठान निर्माण करणे. वैयक्‍तिक आणि सामाजिक आरोग्य, सर्व प्रकारचे प्रदूषण - निर्मूलन, स्वच्छ्तेचे महत्त्व, शिक्षणाचे प्रश्‍न, स्त्रियांचे शिक्षणाचे महत्त्व, व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम यावर प्रबोधन करायला हवेच, पण या विश्‍वाकडे आणि आपल्या जीवनाकडे व त्यातून निर्माण होणा‍र्‍या प्रश्‍नांकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहण्याची साक्षरता निर्माण होणे आवश्यक आहे. केवळ विज्ञान, गणित, तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्र यांचाच चिकित्सक अभ्यास होणे अपेक्षित नाही, तर त्याचबरोबर साहित्य, संगीत व इतर कला, सामाजिक नीति, विधी आणि न्याय, राजकारण, इतिहास या सर्वांची तात्त्विक साक्षरता निर्माण झाली पाहिजे. ही सर्व क्षेत्रे खूपच व्यापक आहेत. या सर्व क्षेत्रात केल्या गेलेल्या योगदानावरच सामाजिक जीवनाच्या गुणवत्तेचे मूल्यनिर्धारण होणार आहे.

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या छत्राखाली एकत्र येऊन विचारविनिमय करण्याची आपणा सर्वांना संधी मिळणार आहे आणि पूर्ण विचार केल्याखेरीज आपण कोणतेच पाऊल उचलणार नाही. सर्वांना आपणास बरोबर घेऊन जायचे आहे. धर्म आणि पराभौतिकी यांच्या जोखडाखाली राबवली गेलेली सामाजिक नीती आपणाला बदलायची आहे याचे भान आपणास कधीही सोडता येणार नाही. आपला संघर्ष वैचारिक राहिला पाहिजे. म. त. प. ही एक चळवळ आहे आणि ती विवेकी लोकांची आहे. आपले प्रश्‍न आपणच सोडवले पाहिजेत. ते सोडवण्यासाठी ईश्‍वर किंवा ईश्‍वराचे अवतार यापैकी कोणीच येणार नाहीत. एकीकडे अज्ञान, अंधश्रद्धा आणि दारिद्रय यांनी आपला समाज पिचला गेलेला असतानाच अंतर्गत हेवेदावे, राजकीय स्वार्थ, सर्व प्रकारचा सत्तासंघर्ष, सार्वत्रिक भ्रष्टाचार, पराकोटीचे सामाजिक अन्याय आणि मानवी जीवनावर अशांततेची तलवार सातत्याने टांगती ठेवणारा निर्घृण हिंसाचार या सर्वांनी आपला समाज पोखरुन निघालेला आहे. अशा समाजाचे बौद्धीक आणि नैतिक परिवर्तन करणे अशक्यप्राय वाटले तरी ती जबाबदारी म. त. प. ने स्वीकारलीच पाहिजे असे मला वाटते. कारण या देशात दोन महान विभूति होऊन गेल्या आहेत. गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी. ते ईश्‍वरी अवतार नव्हते, तर या मातीतच जगणारे आपल्यासारखेच मानवप्राणी होते. त्यांच्याप्रमाणेच आपला संघर्षही आपणा स्वत:शीच आहे आणि तो करणे हा आपला नैतिक बांधिलकीचाच भाग आहे.