तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक गुरूवर्य प्रा. श्रीनिवास हरी दीक्षित हे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजचे तत्त्वज्ञान विभागप्रमुख म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते.१९६३ ते १९६६ या काळात मी त्यांचा विद्यार्थी होतो. अनेक तात्त्विक प्रश्‍न आणि समस्या त्याकाळी माझ्या डोक्यात घोंघावत होत्या.प्रा. दीक्षितांच्यामुळे या प्रश्‍नांची अथवा समस्यांची काही एक उत्तरे त्यांच्या व्याख्यानातून मिळ्त असत. त्यांचे व्याख्यान म्हणजे एक संवाद असे.ते स्वत:च एखादा प्रश्‍न उपस्थित करीत असत आणि त्यांचे त्या संदर्भातले उत्तरही तेच देत असत.पुढे आणखी एखादा उपप्रश्‍न अथवा युक्‍तिवाद ते मांडत असत आणि त्या युक्‍तिवादाचे उत्तर ते पुरवीत असत. त्यांच्या या शिकविण्याच्या पध्दतीमुळे विद्यार्थ्याच्या मनातील प्रश्‍नांना जसा हात घातला जात असे, तसेच त्या समस्येसंदर्भात आणखी काही प्रश्‍न विद्यार्थ्याच्या मनात उत्पन्न होत असत. या पध्दतीने प्रा.दीक्षितांचे विद्यार्थी निश्चितच प्रभावित होत असत. त्यांच्यापासून काही एक प्रेरणा घेत असत.हा अनुभव माझा एकट्याचा होता असे नव्हे, अनेक विद्यार्थ्यांना कमी अधिक प्रमाणात हाच अनुभव येत असे.

असे ख्यातनाम तत्त्वचिंतक आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक १९७८ ला सरकारी सेवेतून निवृत झाले. खुद्द राजाराम कॉलेजमध्ये त्यांच्या निवृत्तिनिमित्त्य काही एक कार्यक्रम झाल्याचे मला आज स्मरत नाही. सरांच्या निवृत्ती निमित्ताने माझ्या मनात काही विचार जमा झाले. पहिला विचार असा की, त्यांच्या सर्व आजीमाजी विद्यार्थ्यांचा एक मेळावा कोल्हापुरात घ्यावा. त्या मेळाव्यामध्ये त्यांचा यथोचित गौरव करावा. सर स्वत: राजाराम कॉलेजचे ख्याकीर्त विद्यार्थी.प्रा.ना.सी. फडके यांचे ते विद्यार्थी. मुंबई विद्यापीठाचे ‘तेलंग गोल्ड मेडॅलिस्ट’ असा त्यांचा नावलौकिक सर्वतोमुखी होता. तेव्हा तत्त्वज्ञान विषयामध्ये सर्व प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यास शिवाजी विद्यापीठामध्ये ‘प्रा. श्रीनिवास दीक्षित सुवर्णपदक’ देण्याची व्यवस्था आपण सर्व विद्यार्थ्यांनी मिळून करावी, असा आणखी एक विचार माझ्या मनात आला.असेच काही विचार आणि कल्पना सरांच्या काही माजी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून सांगाव्यात, असा मी निर्णय घेतला. त्यामध्ये प्रा. एच. व्ही. मिरजकर, प्रा.व्ही.एम.शिरगुप्पी, प्रा. सौ. जी .के. वाळ्वेकर,
प्रा. एम. जी. वाली, श्री. कृष्ण्कांत खामकर आदींशी मी विचारविनिमय केला. सर्वांना माझ्या दोन्ही कल्पना आवडल्या. त्यानंतर एस. टी. स्टॅड परिसरातील प्रा. एस. एन. पाटील यांच्या घरी आम्ही सर्वजण एकञ जमलो. प्रा. एस. एन. पाटील हे प्रा. दीक्षितांचे धारवाड येथील कर्नाटक कॉलेजमधील विद्यार्थी व नंतर राजाराम कॉलेजमधील त्यांचे सहकारी.या दृष्टीने पाहिल्यास ते आम्हा सर्वांपेक्षा ज्येष्ठ होते. त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणे शक्य
व्हायचे. त्यांनाही आमची कल्पना पसंत पडली. सर्व माजी विद्यार्थ्यांचे पत्ते गोळा करण्यास सुरवात केली.त्या सर्वांशी पञव्यवहार करुन त्यांना एकूण उपक्रमाची माहिती कळविण्याची जबाबदारी सर्वांना माझ्यावर टाकली. पञव्यवहाराला सर्वच माजी विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
माझा उत्साह त्यामुळे द्विगुणित झाला. नंतर कार्यक्रमाचे स्वरूप, प्रमुख पाहुणे, अध्यक्ष इत्यादी तपशील ठरविण्यास सुरूवात केली.निधी संकलनासाठीही सुरूवात करावयाची, असे आम्ही सर्वांनी ठरविले.

हे सर्व सुरु असतानाच एके दिवाशी प्रा.एस.एन. पाटील मला म्हणाले की, "आपण प्रा.दीक्षितांचा गौरव समारंभ करण्याचे ठरविले आहे. त्यांच्या नावे सुवर्णपदक ठेवण्याची योजना आपण तयार करीत आहोत. तथापि, ह्या सर्व गोष्टींना प्रा. दीक्षितांची निदान Passive consent आहे का, हे त्यांना विचारलेले बरे;आणि मगच आपण पुढच्या तयारीला लागू". सुमारे वर्षभर तरी मी विद्यार्थ्यांच्या संपर्कात होतो. सर्वांशी विचारविनिमय करीत होतो; परंतु या सर्व गोष्टींना प्रा. दीक्षितांची मान्यता घेतली पाहिजे, निदान त्यांच्या कानावर हे घातले पाहिजे, हा मुद्दा आमच्या डोक्यातच आला नव्हता. आम्ही जे काही म्हणू त्यास ते मान्यता देतील, याचा अर्थ त्यांची मान्यता असणार, हे आम्ही गृहीत धरुन चाललो होतो. त्यानंतर एके दिवशी प्रा. एस. एन. पाटील व मी असे दोघेच प्रा. दीक्षितांच्या घरी गेलो. आजवर आम्ही काय काय ठरविले आहे,
काय काय केले आहे, ते सांगण्याची जबाबदारी माझ्यावर होती. साहजिकच अतिशय उत्साहीत होऊन; पण मोजक्याच भाषेत मी सरांना सर्वकाही
सांगितले. त्यांनीही अजिबात विचलित न होता सर्व काही शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले, "दाभोळे, तुम्ही जे सांगितले त्यापैकी काहीही करु नका. मी कोणी मोठा मनुष्य नाही." त्यावर मी जरा आग्रह धरला तरीदेखील निर्लेप वृत्तीने ते म्हणाले की, "मला वगळुन टाका. माझा गौरव करु नका. कारण, माझा गौरव करावा, असे कोणतेही महान कार्य माझ्या हातून झालेले नाही. तुम्हाला जर काही करायचेच असेल, तर तत्त्वज्ञानासाठी
काहीतरी करा. मग त्यामध्ये तुमच्याबरोबर मीही सहभागी होईन. आपला एकदा गौरव झाला की, पुन्हा असाच गौरव होत राहावा अशी अभिलाषा
निर्माण होईल आणि तिचा अंतच होणार नाही." हे सर्व ऎकल्यानंतर एक तत्त्वचिंतक जीवनाकडे किती निरिच्छ व निरपेक्ष वृतीने पाहू शकतो ह्याचा एक खोल ठसा माझ्या मनावर उमटला. काही काळ मी थोडासा निरुत्साहीच झालो हे खरे. तथापि, थोडा खोलवर विचार केल्यानंतर सरांचे म्हणणे पटू लागले. ज्यांच्याशी यापूर्वी पत्रव्यवहार केला होता. अशा सर्वांना ह्या प्रकारचा कोणताही कार्यक्रम होणार नाही, असे कळवून टाकले आणि प्रा. दीक्षितांनी सांगितलेल्या ‘तत्त्वज्ञानासाठी काही तरी करा’ या सूचनेवर विचार करू लागलो. नेमके काय केले पाहिजे? सुचत नव्हते.

ज्येष्ठ तत्त्वचिंतक प्रा.मे. पुं. रेगे यांच्याशी विद्यार्थीदशतेच माझा परिचय झाला होता.१९६४ साली मी एम. ए. च्या प्रथम वर्षात असताना पन्हाळा (जि. कोल्हापूर) या थंड हवेच्या ठिकाणी इंडियन फिलॉसॉफिकल असोसियशनचे अधिवेशन आयोजित होते. राजाराम कॉलेजमधील फिलॉसॉफी असोसियशनचा सेक्रेटरी या नात्याने मी या अधिवेशनात दोन दिवस उपस्थित होतो. प्रा. दि. य. देशपांडे, प्रा. के. जे. शहा, प्रा. मे. पुं. रेगे आदि ज्येष्ठ विचारवंतांना ऎकण्याची संधी त्यावेळी मला प्राप्त झाली. आता वरील परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी व तत्त्वज्ञानासाठी नेमके काय करावे या विषयी प्रा. रेगे यांना भेटण्याचे मी ठरविले. त्यांना त्यांच्या मुंबईच्या पत्त्यावर पत्र पाठविले. त्यांनी त्या पत्रास तत्काळ उत्तर देऊन पुणे येथे येण्यास सांगितले. प्रा. अ. भि. शहा यांना त्यांच्या घरी मी त्यांना भेटलो. त्यांच्याशी थोडा विचारविनिमय झाला. प्रा. दीक्षितांच्या कल्पनेला मूर्त रुप कसे द्यावे, हा मुख्य प्रश्‍न होता. प्रा. रेगे म्हणाले की, पुढील १५ दिवसांत केव्हातरी मी कोल्हापूरला येईन, त्यावेळी आपण तिघे व इतर कुणी आल्यास एकत्र बसून चर्चा करु. त्याप्रमाणे प्रा. रेगे हे काही दिवसांनी कोल्हापूरला आले. प्रा. दीक्षितांच्या घरीच आम्ही जमलो होतो. या चर्चेतून काही गोष्टी स्पष्ट झाल्या. तत्त्वज्ञान विषयासाठी व तत्त्वज्ञानात्मक विचारांचा प्रसार करण्यासाठी एक परिषद स्थापन करावी. तिचे कार्य मातृभाषा मराठीतून चालावे, एवढया दोन गोष्टी निश्‍चित झाल्या. या संदर्भात गुरुवर्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. जे. पी. नाईक,
प्रा. अ. भि. शहा, प्रा. अ. के. भागवत आदिंशी प्रत्यक्ष भेटून चर्चा करावी अशी सूचनाही प्रा. रेगे यांनी मला केली. त्यानुसार सर्वांशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करण्याची संधी मला मिळाली. त्या सर्वांना ही कल्पना आवडली असल्याचे त्यांनी मला सांगितले. गाठीभेटीचा हा सर्व वृत्तांत मी प्रा.रेगे यांना पत्राने कळविला.
दरम्यानच्या काळात प्रा. रेगे यांनी तत्वज्ञान विषय शिकविणार्‍या महाराष्ट्रातील सर्व प्राध्यापकांची यादी तयार केली. प्रा. शि. स. अंतरकर, डॉ. सु. वा. बखले, प्रा. नागोराव कुंभार आदींनी या कामात त्यांना सहकार्य केले. त्यानंतर प्रा. रेगे यांनी एक आवाहनपत्र तयार केले आणि सर्व संबंधितांना त्यांनी ते पाठवूनही दिले. हे आवाहनपत्र इंग्रजी भाषेत असून नेमकेपणाने काय करावयाचे आहे, हे त्यात स्पष्ट केले. आणखी असेही स्पष्ट केले आहे की, प्रारंभीच्या काळातील या पुढील सर्व पत्रव्यवहार, प्राथमिक बैठक व तिचे नियोजन वगैरे प्रा. दाभोळे करणार आहेत, असे त्या
पत्रात त्यांनी म्हटले. अशा प्रकारे महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा विषय प्राध्यापकांपर्यंत पोहचविण्याचे काम प्रा. रेगे यांनी केले. हे त्यांचे योगदान फार मौलिक स्वरुपाचे आहे. मला शिवाजी विद्यापीठ कक्षेतील तत्त्वज्ञान विषयाच्या प्राध्यापकांची पूर्ण माहिती होती. कारण, त्या काळात विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान अभ्यासमंडळाचा मी सदस्य होतो आणि प्रा. दीक्षित या अभ्यासमंडळाचे अनेक वर्षे अध्यक्ष होते. महाराष्ट्रातील अन्य विद्यापीठांतील तत्त्वज्ञान विषयाच्या प्राध्यापकांची मला पूर्ण माहिती नव्हती. प्रा. रेगे यांचा महाराष्ट्रभर संचार असल्याने त्यांना ही माहिती गोळा करता आली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्या आवाहनपत्राची भाषा, तीही अतिशय महत्त्वपूर्ण अशीच होती. प्रा. रेगे यांच्यामुळे एक खंबीर अशी पार्श्‍वभूमी तयार झाली. त्यामुळे पुढील कार्याला निश्‍चित अशी दिशा प्राप्त झाली. पुढील कार्याची आखणी करणे त्यामुळेच मला शक्य झाले, हे नम्रपणे येथे नमूद करतो.

परिषदेची स्थापना कण्याच्यादृष्टीने पहिली सभा कोल्हापुरात घ्यावी, हे निश्‍चित झाले. तारीख आणि ठिकाण निश्‍चित करायचे होते.
२- ११- १९८० ही तारीख सर्व संमतीने ठरली. कारण, त्यादिवशी रविवार होता. परगावाहून येणार्‍यांची सोय व्हावी, त्यांना रजा काढावी लागू नये, हा विचार त्यामागे होता. या बैठकीसाठी टाकाळा परिसरातील ‘हिंदकन्या छात्रालय’ हे ठिकाण सर्वदृष्टीने सोयीचे होते. मी व सुरेश शिपुरकर, असे
दोघे दलितमित्र बापूसाहेब पाटील हे स्वत: तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापक ना. सी. फडके यांचे विद्यार्थी आणि महारष्ट्राला सुपरिचित अशा कोरगावकर ट्रस्टचे संचालक असल्याने या बैठकीसाठी हिंदकन्या छात्रालयाची जागा त्यांनी लगेच उपलब्ध करुन दिली. प्रा. रेगे यांनी कोरगावकर
यांना पत्र पाठविले होतेच. महाराष्ट्रातील सर्व प्राध्यापकांची, तत्त्वज्ञानाविषयी आस्था असणार्‍या अशा सर्व व्यक्‍तिंची यादी आता तयार झाली होती.
रविवार दि. २- ११- १९८० या दिवशी आयोजित केलेल्या या सभेचे निमंत्रण सुमारे महिनाभर आधीच पाठविले होते. अनेकांनी या उपक्रमास आपला मनोमन पाठिंबा असल्याचे कळविले.

या बैठकीस महाराष्ट्रातील एकूण ३० जण उपस्थित होते. त्यामध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजाराम कॉलेज व राजर्षी छ. शाहू कॉलेजमधील तत्त्वज्ञान विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. श्रीनिवास दीक्षित अध्यक्ष होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मे. पुं. रेगे उपस्थित होते. प्रा. शि. स. अंतरकर (गोवा), डॉ. सु. वा. बखले (नागपूर), प्रा. एस. एन. पाटील (कोल्हापूर), प्रा. एस. के. पोंदे (वारणानगर), प्रा. का. बं. वाडेकर (सावंतवाडी) अशी मंडळी स्वखर्चाने या बैठकीला उपस्थित राहिली होती. एक दिवसाच्या या बैठकीची दोन सत्रे
आखली होती. सकाळी १० वा. पहिले सत्र सुरु झाले. त्यामध्ये सर्व वक्त्यांनी तत्त्वज्ञान विषयाच्या सद्य: स्थितीसंबंधी, शिक्षणक्रमातील स्थानासंबंधी व त्याच्या सामाजिक महत्वाविषयी आपले विचार मांडले. दु. १ वा. हे सत्र संपले. भोजन व विश्रांतीनंतर दुसरे सत्र दु. ठीक ३ वा. सुरु झाले. यामध्ये महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या संघटनात्मक बाजूसंबंधी सविस्तर विचारविनियम होऊन खालीलप्रमाणे ठराव संमत करण्यात आला.

"महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या स्थापनेची एकंदर पूर्वतयारी करण्यासाठी व परिषदेच्या घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी एकूण १८ व्यक्‍तींची सुकाणू समिती (Steering Cornmittee) स्थापन करण्यात यावी." या समितीवर खालील मान्यवरांची सदस्य म्हणून नियुक्‍ती करण्यात यावी. १) डॉ. सु. शि. बारलिंगे, २) डॉ. आर. सुंदरराजन, ३) डॉ. ज. वा. जोशी, ४) प्रा. मे. पुं. रेगे, ५) प्रा. एन. बी. वनमाळी, ६) डॉ. सु. वा. बखले, ७) डॉ. एस. एस. अंतरकर, ८) डॉ. ग. ना. जोशी, ९) डॉ. एस. आर. कावळे, १०) प्रा. जी. व्ही. काळे, ११) डॉ. शरद देशपांडे, १२) प्रा. ना. ल. कुंभार, १३) प्रा. हेमचंद्र धर्माधिकारी, १४) प्रा. श्रीनिवास दीक्षित, १५) प्रा. एस. के. पोंदे, १६) प्रा. एस. एन. पाटील, १७) प्रा. ज. रा. दाभोळे, १८) प्रा. सौ. एन. एस. बोडस

सुकाणू समितीचे निमंत्रक म्हणून प्रा. ज. रा. दाभोळे यांनी काम पहावे, असे ठरविण्यात आले.
सुकाणू समितीची पहिली बैठक दि. २८- १२- १९८० रोजी पुणे अथवा मुंबई मध्ये घेण्यात यावी.
वरील प्रमाणे सर्व ठराव संमत करुन आभार प्रदर्शनानंतर ही सभा सायंकाळी ६.०० वा. समाप्‍त झाली.
सुकाणू समितीची बैठक पुणे येथील स. प. महाविद्यालयात घेण्याविषयी मी प्राचार्य डॉ. एस. आर. कावळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी
ही बैठक घेण्याचे मान्य केले.

कोल्हापूर येथील बैठकीत ठरल्याप्रमाणे ही बैठक २८ डिसेंबर १९८० रोजी स. प. महाविद्यालयाच्या प्राध्यापक कक्षामध्ये भरविण्यात आली
होती. त्यावेळी समितीचे खालील सभासद उपस्थित होते.
१) डॉ. एस. एस. अंतरकर, २) डॉ. सु. वा. बखले, ३) प्रा. श्री. ह. दीक्षित, ४) प्रा. ज. रा. दाभोळे, ५) डॉ. ज. वा. जोशी, ६) डॉ. एस. आर. कावळे, ७) प्रा. एस. एन. पाटील, ८) प्रा. मे. पुं. रेगे, ९) डॉ. आर. सुंदरराजन

खालील सभासद अनुपस्थित होते
१) डॉ. सु. शि. बारलिंगे, २) प्रा. सौ. एन. एस. बोडस, ३) डॉ. ग. ना. जोशी, ४) प्रा. जी. व्ही. काळे, ५) प्रा. ना. ल. कुंभार,
६) प्रा. एस. के. पोंदे, ७) प्रा. एम. बी. वनमाळी, ८) प्रा. हेमचंद्र धर्माधिकारी

सुकाणू समितीचे निमंत्रक प्रा. ज. रा. दाभोळे यांनी बैठकीच्या सुरुवातीस कार्यक्रमपत्रिका वाचून दाखविली. बैठकीचे अध्यक्ष म्हणून प्रा. श्री. ह. दीक्षित यांची निवड करण्यात आली. या बैठकीत पुढील कामकाज झाले.

१) परिषदेचे नाव "महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद" असावे की, "मराठी तत्त्वज्ञान परिषद" असावे या मुद्यांवर चर्चा झाली. ही परिषद खास करुन मराठी भाषकांसाठी असल्याने प्रदेशवाचक नावाऐवजी मराठी तत्त्वज्ञान परिषद हे नाव ठेवावे, असे काहींचे म्हणणे पडले.

२) दुसर्‍या बाजूचे म्हणणे असे की, ‘महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद’ असे नाव ठेवून परिषदेचा संपूर्ण व्यवहार घटनेत तसे नमूद करुन
संपूर्णतया मराठीत व्हावा. मात्र, एखाद्या अमराठी सभासदाने क्वचित अन्य भाषेचा वापर केला, तर ते बहिष्कार्य मानू नये, हे दुसरे मत सामान्यपणे मान्य झाले.

३) घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता खालील लोकांची उपसमिती नेमण्यात आली.

१) डॉ. ज. वा. जोशी, २) डॉ. ग. ना. जोशी, ३) डॉ. एस. आर. कावळे, ४) प्रा. ज. रा. दाभोळे, ५) डॉ. शरद देशपांडे.

या समितीने प्रा. दे. द. वाडेकर, न्यायमूर्ती श्री. वि. अ. नाईक वगैरे तज्ञांचा सल्ला घेऊन काम करावे अशीही सूचना देण्यात आली. हा मसुदा मार्च १९८१ पर्यंत तयार करुन कागदाच्या एका बाजूस चक्रांकित करुन ‘सुकाणू समिती’च्या सर्व सभासदांकडे पाठवावयाचा आहे.

कोर्‍या बाजूवर हे सभासद त्या त्या कलमाच्या समोर आपल्या सूचना लिहितील. त्यांचा विचार करुन उपसमिती घटनेच्या कच्च्या मसुद्याचा फेरविचार करील. हा मसूदा व सूचना ऑक्टोबर ११८१ मध्ये नागपूर येथे होणार्‍या परिषदेच्या स्थापना सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येईल.

नागपूर विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाकडून नागपूर येथे ऑक्टोबर १९८१ मध्ये एक तत्त्वज्ञान विषयक चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे. त्यासाठी आमच्या परिषदेच्या सर्व संभाव्य सभासदांना निमंत्रणे पाठविण्याची व्यवस्था करण्‍यात येईल. हे चर्चासत्र संपण्‍याच्या दुसर्‍या दिवशी अथवा सुरु होण्याच्या आदल्या दिवशी आमच्या परिषदेच्या स्थापना सभेची बैठक होईल. सर्व संबंधितांना आणि तत्त्वज्ञानाविषयी आस्था असणार्‍या मराठी जनांना जाहीर निमंत्रण दिले जाईल.

घटना मंजूर होऊन परिषदेची रीतसर स्थापना होईपर्यंत सर्व खर्च प्रा. ज. रा. दाभोळे यांच्यामार्फत व्हायचा आहे. सुकाणू समितीचे निमंत्रक या नात्याने प्रा. दाभोळे यांनी उत्तम कामगिरी केली आहे. आता घटना तयार करण्यासाठी नेमलेल्या उपसमितीचे निमंत्रक म्हणून त्यांनीच काम पहावयाचे आहे. सुकाणू समितीच्या सर्व सदस्यांनी तूर्त प्रत्येकी रु. ५०/- प्रा. दाभोळे यांच्याकडे द्यावेत. ही रक्कम म. ऑ. अथवा चेकने खालील नावे व पत्त्यावर पाठवून द्यावी. घटनेत आजीव सदस्यत्वाची तरतूद असेल. सदस्यांनी आता दिलेले पैसे त्यांच्या आजीव सदस्यत्वाच्या वर्गणीमध्ये वळते केले जातील. प्रा. दाभोळे यांनी सर्व खर्चाचा हिशोब ठेवायचा आहे.

पत्ता : प्रा. ज. रा. दाभोळे, ११८५/१८ क, राजारामपुरी, नवीन वसाहत, कोल्हापूर

घटना तयार करण्यासाठी डॉ. ज. वा. जोशी यांनी खूप परिश्रम घेतले. निमंत्रक या नात्याने उपसमितीच्या सर्व सदस्यांची एक बैठक मी डॉ. ज. वा. जोशी यांच्या पुणे येथील घरीच बोलाविली होती. त्यावेळी मी, डॉ. ज. वा जोशी व डॉ. एस. आर. कावळे, असे तिघेजण उपस्थित होतो.
घटनेचा मसुदा जवळ जवळ तयार झाला होता. प्रा. वाडेकर आणि न्यायमूर्ती वि. अ. नाईक यांना भेटायचे होते. त्या दिवशी सायंकाळी प्रा. वाडेकरांशी कलमवार चर्चा केली. न्यायमूर्ती वि. अ. नाईक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यावर डॉ. ज. वा. जोशी यांनी त्यांची वेळ मागून घेऊन घटनेचा मसुदा त्यांना दाखवावा आणि मसुद्याअला अंतिम रुप देऊन तो सुकाणू समितीच्या सर्व सदस्यांकडे पाठवून द्यावा. त्यांच्याकडून आलेल्या सूचनांसह हा मसुदा नागपूर येथे आयोजित केलेल्या चर्चासत्राच्या वेळी होणार्‍या स्थापनासभेत ठेवावा, असे आम्ही सर्वानुमते ठरविले.

१० व ११ नोव्हेंबर १९८१ रोजी नागपूर येथे एक चर्चासत्र घेण्याचे निश्‍चित झाले. त्यासाठी आवश्यक ती लेखांची चक्रमुद्रणे, बॅनर, फोल्डर,
डॉ. ज. वा. जोशी यांच्या सांगण्यानुसार घटनेच्या मसुद्याची चक्रमुद्रणे इत्यादी सर्व गोष्टींची तयारी डॉ. सु. वा. बखले, डॉ. ना. शं. द्रविड व त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी पूर्ण केली होती; परंतु नागपूर विद्यापीठ परिसरातील वातारण अनपेक्षितपणे बिघडल्यामुळे, हे चर्चासत्र आणि परिषदेची स्थापनासभा अशा दोन्ही गोष्टी रहित कराव्या लागल्या. त्या आशयाची डॉ. ना. शं. द्रविड व डॉ. सु. वा. बखले यांची पत्रे दि. ५- ११ - ११८१ रोजी
मला मिळाली. त्यानंतर हे स्थापना अधिवेशन अन्यत्र घेण्याविषयी विचारविनिमय सुरु झाला. कोल्हापूर अथवा पुणे येथे हे स्थापना अधिवेशन घ्यावे, अशी सूचना डॉ. बखले यांनी केली होती. अशा परिस्थितीत १९८१ हे साल संपले. १९८२ साल उजाडले आणि स्थापना अधिवेशन घेण्याच्या दृष्टीने हालचाली गतिमान झाल्या. मध्यंतरीच्या काळात प्रा. मे. पुं. रेगे नागपूर येथे अन्य काही कामानिमित्त्य गेले होते. त्यावेळी तेथील सर्वांशी त्यांनी चर्चा केली आणि २८ ऑक्टोबर १९८२ रोजी त्यांनी मला एक पत्र पाठविले. त्यामध्ये २० आणि २१ नोव्हेंबर १९८२, असे दोन दिवस हे स्थापना अधिवेशन पुणे येथील इंडियन इन्स्टिटयुट ऑफ एज्युकेशनच्या सभागृहात घेण्याचा मनोदय व्यक्‍त केला.

ही सूचना विचारात घेऊन व प्रा.दीक्षित यांच्याशी चर्चा करुन सर्व संबंधिताना या स्थापना अधिवेशनास उपस्थित राहण्याविषयीचे निमंत्रण मी सर्वांना पाठवून दिले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हे स्थापना अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात ‘नैतिक मूल्यांवरील भारतीय चिंतन’ आणि ‘स्वातंत्र्य’ या दोन विषयांवर दोन चर्चासत्रे पहिल्या दिवशी आयोजित केली. होती. त्यामध्ये प्रा. दीक्षित, प्रा. द्रविड, प्रा. अंतरकर, प्रा. जकाते, डॉ. रमाकांत सिनारी आदी सहभागी झाले होते. दुसर्‍या दिवशी ‘सामाजिक न्याय’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. त्यामध्ये प्रा. मो. प्र. मराठे, डॉ. ज. वा. जोशी, डॉ. भा. ग. केतकर आदी सहभागी झाले होते. त्यानंतरच्या सत्रात
महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेची स्थापन, घटनेची स्वीकृती, कार्यकारी मंडळाची निवड आदी गोष्टी पार पडल्या. भोजनोत्तर या अधिवेशनाची सांगता झाली.

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे पहिले अधिवेशन कोल्हापूरमध्ये घ्यावे, असा एक विचार माझ्या मनात पक्का होता. त्या दृष्टीने प्रा. दीक्षितांशी मी प्रथम विचारविनिमय केला. त्यानंतर दलितमित्र बापूसाहेब पाटील, श्री. नानासाहेब गद्रे, प्रा. एस. एन. पाटील, अड. गोविंदराव पानसारे, श्री.
वसंतराव पंदारे, सुरेश शिपूरकर आदींशी प्रत्यक्ष चर्चा केली. सर्व संबंधितांची एक बैठक दि. २४- ७- १९८३ रोजी कॉमर्स कॉलेजच्या एका हॉलमध्ये बोलावली. परिषदेच्या तयारीसाठी एक अस्थायी समिती नेमण्यात आली. त्यामध्ये वरील सर्व मान्यावरांच्या जोडीने प्रा. सौ. जी. के . वाळवेकर ( गोखले कॉलेज), प्रा. एस. जी. कुलकर्णी ( न्यू कॉलेज कोल्हापूर), श्री. ए. बी. मुंडे (विद्यार्थी, शाहू कॉलेज) यांचाही समावेश करण्यात
आला. दि. १२ व १३ नोव्हेंबर १९८३, असे दोन दिवस हे अधिवेशन कोल्हापूरात भरवावे, असे या बैठकीत निश्‍चित करण्यात आले. कोल्हापूरातील जैन बोर्डिंगमध्ये हे अधिवेशन घ्यावे असेही ठरविण्यात आले. अस्थायी समितीचा सचिव आणि निमंत्रक अशा दोन्ही भूमिका प्रा. दाभोळे यांनी कराव्यात, असेही ठरविण्यात आले.

प्रथम अधिवेशनासाठी येणारा खर्च स्वागत समिती सभासद व देणगीदारांकडून मिळणार्‍या देणग्यातून उभा करावा, असे ठरविण्यात आले. अस्थायी समितीच्या यापुढील बैठका दर महिन्याच्या एक तारखेस (१ ऑगस्ट, १ सप्टेंबर व १ ऑक्टोबर) घ्याव्यात असेही ठरले. ‘न्याय व सामाजिक समता’ व मार्क्स जन्मशताब्दी संदर्भात एखादे चर्चासत्र घ्यावे असे सर्वानुमते ठरले.

हे सर्व चालू असताना नागपूरहून डॉ. बखले यांनी हे अधिवेशन नागपुरात घ्यावे, आम्ही सर्वजण तयारीला लागलो आहोत, असे मला कळविले. त्यानंतर कोल्हापुरातील सर्व संबंधितांची गाठभेट घेऊन त्यांना ही माहिती दिली. पहिले अधिवेशन नागपुरात होत असेल, तर होऊ द्यावे,
त्यानंतरचे अधिवेशन आपण कोल्हापुरात घेऊ, असे सर्वानुते ठरले. मी सर्व सभासदांना नागपूर अधिवेशनाचे निमंत्रण पाठविले. १० व ११ नोव्हेंबर असे दोन दिवस, हे अधिवेशन भरविले जाणार होते. हे होईतोपर्यंत ऑक्टोबर महिना संपून गेला. १० नोव्हेंबरपासून शरद जोशींच्या शेतकरी संघटनेने महाराष्ट्रभर ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरु करण्याची घोषणा केली. अशा परिस्थितीत सभासदांना नागपुरात पोहचणे कठीण होईल आणि अधिवेशनाला फारसा प्रतिसाद मिळणार नाही, हे ध्यानात घेऊन नागपुरात होणारे प्रथम अधिवेशन स्थगित करणे भाग पडले. त्या आशयाचे एक पत्रक सर्व वृत्तपत्रांना प्रसिद्धीस दिले.

आता हे अधिवेशन कोल्हापूरात घ्यावे असे ठरले. दरम्यान, दिवाळीची सुटटी संपत आलेली. डिसेंबर, जानेवारीत अधिवेशन भरविणे शक्य
नव्हते; त्यामुळे १ व २ मे १९८४ अशा दोन तारखा निश्‍चित करुन आम्ही सर्वजण कामाला लागलो. प्रथम अधिवेशनात दोन चर्चासत्रे आयोजित केली होती. १) नवमार्क्सवाद व २) न्याय व सामाजिक समता. नवमार्क्सवाद या विषयावर प्रा. मे. पुं. रेगे, प्रा. डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. नी. र. वर्‍हाडपांडे आदींना निमंत्रणपत्रे पाठवली. सर्वांनी वेळेत आपले निबंध पाठवले आणि अधिवेशनात ते सादरही केले. या चर्चासत्राचे अध्यक्ष श्री. शांताराम गरुड हे होते.

न्याय व सामाजिक समता या विषयावर प्रा. प्रदीप गोखले, श्री. रा. ना. चव्हाण (वाई), प्रा. दि. मा. खैरकर या प्रमुख मंडळींनी आपले निबंध सादर केले. उद्‌घाटक डॉ. सु. शि. बारलिंगे हे होते. त्यांनी येण्याचे मान्य केले होते. तथापि, ते आले नाहीत, म्हणून आयत्यावेळी प्रा. म. द. हातकणंगलेकर यांना मी व प्रा. रेगे यांनी विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात हा उद्‍घाटन समारंभ संपन्न झाला. सुमारे ५० सदस्य उपस्थित होते. सर्वांची भोजन व निवासव्यवस्था जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली. उद्‍घाटन सत्रानंतरचे सर्व कार्यक्रम जैन बोर्डिंगमधील चतुरभाई हॉलमध्ये पार पडले. जैन बोर्डिंग परिसराला ‘महर्षि वि. रा. शिंदे नगर’, असे नाव देण्यात आले होते. कराडचे दानशूर व्यापारी ‘रघुनाथ भिकाजी वांकर’ यांचे नाव सभागृहाला देण्यात आले होते.या संदर्भात जैन बोर्डिंगचे त्यावेळचे सुपरिंटेंडेंट श्री. शामकांत पाटील यांनी पुढाकार घेतला होता. त्या बोर्डिंगमधील विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून उत्स्फूर्त काम केले. या अधिवेशनाचे
स्वागताध्यक्ष दलितमित्र बापूसाहेब पाटील हे होते. निधिसंकलन कार्यात बापूसाहेब व सुरेश शिपूरकर आदींनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.
त्यामुळेच हे पहिले अधिवेशन व्यवस्थित व दिमाखदार स्वरुपात संपन्न झाले. या अधिवेशनाच्या शेवटी भरलेल्या सर्वसाधारण सभेत प्रा. दि. य.
देशपांडे यांनी परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवावे, असा ठराव सर्व संमतीने करण्यात आला. कार्याध्यक्ष म्हणून प्रा. ज. रा. दाभोळे यांनी काम पाहावे असेही, ठरविण्यात आले.

नागपूरच्या सर्व कार्यकर्त्यांना परिषदेचे अधिवेशन, नागपुरात घ्यावे अशी तीव्र इच्छा होती. स्थापना अधिवेशन घेण्याच्यावेळी परिस्थिती अनुकूल नसल्याने ते घेता आले नाही, म्हणून नागपुरकरांना दुसरे अधिवेशन भरविण्याची संधी द्यावी, असे सर्वानुमते ठरले. स्थानिक सचिव म्हणून प्रा. प्र. ब. कुलकर्णी यांनी काम पाहावे असे ठरले. दि. ६ व ७ नोव्हेंबर १९८४ असे दोन दिवस निश्‍चित करण्यात आले. प्रा. कुलकर्णींनी सर्व सदस्यांना निमंत्रण पाठविले. या अधिवेशनात ‘ नवहिंदुत्ववाद’ आणि ‘व्यक्‍तीची तदेवता’ या दोन विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली होती. त्याशिवाय व्यक्‍तिगत निबंध वाचनासाठी एक चर्चासत्र राखून ठेवले होते. उद्‌घाटक म्हणून डॉ. वा. शि. बारलिंगे हे होते. हे अधिवेशन नागपूर महाविद्यालयात संपन्न झाले. या महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीतील दरबार हॉलमध्ये सर्व कार्यक्रम पार पडले. परिषदेचे अध्यक्ष प्रा. दि, य. देशपांडे व डॉ. सु. वा. बखले यांच्या संयोजनामुळे हे अधिवेशन एका वैचारिक उंचीवर पोहचले.

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे स्थापना अधिवेशन, प्रथम व द्वितीय अधिवेशन या संबंधीचा हा धावता आढावा घेण्याचा मी प्रयत्‍न केला आहे. तपशीलात खूप जाता आले असते; पण विस्तारभयास्तव ते मी टाळले आहे. तिसरे अधिवेशन भिवंडी येथील भिवंडी निजामपूर नगरपालिका महाविद्यालयात अतिशय दिमाखदार आणि उत्स्फूर्तपणे पार पडले. प्रा. अशोक कोर्डे, प्रा. एस. जी. निगळ, प्रा. फापाळे या सर्वांनी खूप परिश्रम घेतले. या तृतीय अधिवेशनापासून ते २३ व्या अधिवेशनापर्यंतचा संपूर्ण आढावा प्रा. फापाळे यांनी याच स्मरणिकेत घेतला आहे. त्यांना मी मन:पूर्वक धन्यवाद देतो.