प्रदीप प्र. गोखले

विद्रोहाचे तत्त्वज्ञान याचा चटकन डोळयासमोर येणारा अर्थ असा की, ज्या तात्त्विक भूमिकेद्वारे विद्रोहाचे समर्थन केले जाते. अशी तात्त्विक भूमिका. या अर्थानुसार विद्रोहाचे तत्त्वज्ञान विद्रोहाभिमुख असले पाहिजे, विद्रोहानुकूल असले पाहिजे, असे सूचित होते. क्रांतीचे तत्त्वज्ञान, दु:खमक्तिचे तत्त्वज्ञान यासारख्या पदावलींमध्ये ‘चे तत्त्वज्ञान ’मधील ‘चे’ या प्रत्ययाचा असा अर्थ होतो पण ‘चे तत्त्वज्ञान ’ ही पदावली काहीवेळा तटस्थपणे ही वापरली जाते. शिक्षणाचे तत्त्वज्ञान, विज्ञानाचे तत्त्वज्ञान, धर्माचे तत्त्वज्ञान यासारख्या पदावलीमध्ये हे चित्र दिसते. (या ठिकाणी धर्माचे तत्त्वज्ञान आणि धार्मिक तत्त्वज्ञान यामध्ये स्पष्ट फरक आपल्याला अभिप्रेत आहे) मला ‘ विद्रोहाचे तत्त्वज्ञान ’ ही पदावली या दुस‌र्‍या अर्थाने अभिप्रेत आहे.विद्रोहाचे तत्त्वज्ञान म्हणजे विद्रोहविषयक तत्त्वज्ञान असे तत्त्वज्ञान विद्रोही, विद्रोहपर, किंवा विद्रोहवादी असायला पाहिजे असे मुळीच नाही. ते विद्रोहाचे तटस्थापणे विचार करणारे असेल पण असा विचार करता करता ते विद्रोहाला प्रतिकूलही ठरु शकेल. अर्थात या निबंधात मला विद्रोहाला अनुकूल किंवा प्रतिकूल भूमिका घ्यायची नाही. पण विद्रोहाच्या संर्दभात काही अर्थपूर्ण प्रश्‍न उपस्थित करता आले तरी पुष्कळ ! अशी माझी भूमिका आहे.
एक प्रश्‍न असा की विद्रोह ही माणसाच्या स्वभावाचाच भाग असलेली, स्वाभाविक गोष्ट आहे की बाह्य परिस्थितीने लादलेली, स्वभावा विरुध्द अशी गोष्ट आहे ? मानवी स्वभाव आपण किती स्थितिशील व किती गतिशील मानतो. यावर बहुधा या प्रश्‍नाचे उत्तर अवलंबून आहे.
माणसाचा स्वभाव स्थितिशील मानला तर विद्रोह किंवा बंडखोरी ही त्याच्यातील स्वाभाविक प्रेरणा ठरणार नाही. तर त्याच्या स्थितिशीलतेवर जेव्हा बाहेरुन आघात होईल, तेव्हा त्यावर त्या माणसाची घडणारी तात्पुरती प्रतिक्रिया एवढेच त्या विद्रोहाचे स्वरुप असेल. विद्रोह हा त्याचा स्थायिभाव होणार नाही. फार तर व्याभिचारिभाव होईल. एखाद्या माणसाचा तो स्थायिभाव झालाच तर तो त्याला झालेला चिकट आजार आहे Chronic disease आहे, ती त्याला जडलेली विकृती आहे असे मानले जाईल. या उलट माणसाचा स्वभाव मुळातच गतिमान आहे असे मानल्यास
आपल्याला वेगळे चित्र मिळते. ही गतिमान Dynamism ही सतत काही तरी नवीन, काही तरी वेगळे करण्याची प्रवृत्ती असते.स्वत:च्या त्या त्या वेळच्या इच्छेला प्रमाण मानून बाकीचे सारे नाकरण्याची प्रवृत्ती आहे. किंबहुना सतत बदलण्यात स्वत:ला नाकरण्याची प्रवृत्ती ही सामावलेली असते. उल्लंघनाची स्वत:लाच ओलांडून पुढे जाण्याची प्रेरणा सामावलेली असते. या संकल्पनेनुसार मानवी जीवनात संघर्ष, बंडखोरी या गोष्टी अटळ असतात. त्या स्वाभाविकच असतात. विद्रोही असण्यात गैर काहीच नसते. याउलट आहे ती परिस्थिती बाहेरची किंवा आतली आहे तशी स्वीकारणे, परिस्थितीला शरण जाणे हेच गैर समजले जाईल, दुर्बलता मानली जाईल. तो पराभव मानला जाईल.
या दोनपैकी मानवी स्वभावाचे कोणते आकलन बरोबर आहे हे ठरविणे कठीण आहे. कारण कदाचित आपण असे गृहीत धरुन चालत आहोत की दोन पैकी एक आणि एकच आकलन बरोबर असले पाहिजे आणि आपले हे गृहीतक चुकीचे आहे. याचे कारण असे असू शकते की प्रत्येक माणसात स्थितिशीलता अणि गतिशीलता या दोन्ही घटकांचे मिश्रण असते. तेही वेगवेगळे मिश्रण असते.त्यामुळे विद्रोह ही विकृती आहे असा सर्वसामन्य नियम करता येणार नाही किंवा याउलट जो विद्रोही नाही त्याच्या स्वभावात काहीतरी कमजोरी आहे असाही नियम करता येणार नाही. किंबहुना आपण ज्याला विद्रोही ठरवतो तोही सर्व बाबतीत विद्रोही नसतो. आणि बर्‍याच बाबतीत स्थितिशील असलेला माणूसही लहान मोठया बाबतीत विद्रोहाची भूमिका घेऊ शकतो. एक गमतीशीर उदाहरण पहा. "ठेविले अनंते तैसोचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान" असं
म्हणणारे तुकाराम विद्रोही म्हणता येती का ? पण याच तुकाराम महाराजांमध्ये आ.ह.साळुंखे विद्रोही तुकाराम पाहतात - यात साळुंखेचे काही चुकलंय असे मला म्हणायचे नाही. पण तुकारामासारख्या थोर व्यक्तीमध्ये परिस्थिती आहे तशी स्वीकरण्यातली स्थितिशीलता आणि रुढींविरुध्द बंड करण्याची प्रवृत्ती यांचे मिश्रण कसे आढळते इकडे आपले लक्ष वेधायचे आहे.
तेव्हा विद्रोह ही एक मूलत:च, अनिवार्यपणे चांगलीच गोष्ट आहे. असे म्हणता येणार नाही. साहजिकच विद्रोह कोणत्या परिस्थितीत योग्य ठरेल याचा विचार करावा लागेल.
वरील संदर्भात न्याय आणि सत्याग्रह या संकल्पनांची सांगड विद्रोह या संकल्पनेशी घालण्याचा प्रयत्‍न या निबंधात केला जाईल.

 

डॉ. अशोक चौसाळकर
समाजात चालणार्‍या अनिष्ट प्रथा आणि परंपरा आणि राज्याने चालवलेली दडपशाही याविरुद्ध लोक सातत्याने विद्रोह करीत असतात. कारण अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची मानव जातीची परंपरा आहे. त्यामागची नैतिक कारण परंपरा माणसाने विकसित केलेली आहे. आपण विद्रोह का करीत आहोत, असे तो ज्याप्रमाणे सांगतो त्याचप्रमाणे ज्या अन्याय राजवटीविरुद्ध आपण संघर्ष करीत आहोत. तिला पर्याय देणारी व्यवस्था कशी निर्माण करता येईल याचा पण तो विचार करीत असतो. त्यातूनच त्याचे विद्रोहाचे तत्त्वज्ञान तयार होते. म्हणून विद्रोहाच्या दोन बाजू असतात. एक बाजू नकारात्मक व विघातक असते जी प्रस्थापित व्यवस्थेचा नाश करु इच्छिते. सकारात्मक बाजू विद्रोहानंतरच्या नव्या समाजाच्या रचनेचे आरेखन करते. त्यात जुन्या व्यवस्थेतील अन्याय दूर करुन न्यायाच्या आधारावर समाज स्थापन करण्याची कल्पना अनुस्यूत असते. विद्रोहाबाबतची नैतिक भूमिका माणूस सातत्याने मांडीत असतो.

ऑरिस्टॉटलने आपला ‘Politics ’ ग्रंथामध्ये प्रथमत: विद्रोहाच्या कारणांची मीमांसा केली. त्याच्या मते विद्रोहाच्या मागची कारण परंपरा मोठी असते. सर्दी किंवा खोकला झाला म्हणून लोक बंड करीत नाहीत. जिवावर उदार होऊन हुकूमशहाचा खून करणारा वीर हा एका नैतिक भूमिकेने प्रेरित झालेला असतो. त्याच्या मते प्रत्येक यशस्वी विद्रोह हा राजकीय सत्तांतरात परिवर्तित होतो. कारण राजकीय सत्तांतर हे विद्रोहाच्या यशस्वितेचे प्रमाण असते. एकदा राज्यसत्ता आली की नवा विचार त्यात दृढपणे प्रस्थापित झालेला आपणास दिसतो. कौटिल्याने त्याच्या अर्थशास्त्रात याबाबतचे विवेचन केले आहे. त्यांच्या मते स्वजनांच्या मनामध्ये ज्यावेळी विकार निर्माण होतो, त्यावेळी विद्रोह होतो. असा बदल होण्याचे कारण समाजात चालणारे अन्याय असतात.

भारतीय परंपरेने विद्रोह हे राज्याच्या व समाजाच्या अपरिपूर्णतेतून निर्माण होतात असे मत मांडले आहे. राजाला राज्य करीत असताना आपल्या इंद्रियांवर संयम ठेवावा लागतो. कारण स्वत:च्या मनावर स्वराज्य स्थापन केल्याशिवाय त्याला राज्यावर स्वराज्य स्थापन करता येत नाही. नाही तर तो स्वत:चा बहुमानाचा व नातेवाईकांचा गुलाम बनतो. असा राजा समाजाकडून पदच्युत केला जातो. प्रजा हातात शस्त्र घेऊन उठते व अन्यायी राजास पदच्युत करते. बौद्धांच्या जातककथांमध्ये जनतेच्या उठावाचे अनेक प्रसंग वर्णन केलेले आहेत. जातक सांगतात की, ‘अन्याय करणार्‍या राजास पदच्युत केल्यानंतर त्यास पदच्युत करण्यात पुढाकार घेणारे लोक सत्ता ताब्यात घेत नाहीत, तर ते जुन्या राजाच्या जागी नव्या राजाची निवड करतात आणि अनेकवेळा हा माणूस त्या देशाचा रहिवासी नसतो. त्यामुळे राजकीय सूड घेण्याची स्पर्धा त्यानंतर
निर्माण होत नाही.

भारतीय परंपरेत अन्याय करणार्‍या राजाचा प्रतिकार करावयास त्याने निर्माण केलेल्या व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारावयास लोक सातत्याने तयार असत कारण राजा, चोर आणि बलवान माणूस यांना न भिण्यास धर्माचे अभयत्व सामावलेले आहे असे भारतीय तत्त्वज्ञान सांगते. गौतम बुद्धाने अन्याय करण्याची इच्छा असणार्‍या माणसास न भीता आपले सत्यवर्तन चालू ठेवले पाहिजे असे आग्रही प्रतिपादन केले आहे. आपण आपणास मान्य असणार्‍या धर्माच्या मार्गाने वाटचाल करत राहू. जे विरोध करीत आहेत त्यांच्याशी संघर्ष करु आणि त्यासाठी प्राणाचे बलिदान ही करु. मात्र या लढयात विजय मिळाल्यानंतर आपल्या पराभूत शत्रूची मानखंडना न करता त्याला धर्माच्या उद्याच्या वाटचालीचे साथीदार बनवू अशी बुद्धांची शिकवण होती. शांततेच्या नावाने अन्याय सहन करा अशी त्यांची भूमिका नव्हती. शस्त्रांचा वापर आपणास मान्य नाही पण क्षत्रियास जर इतर पर्याय उपल्बध नसतील तर त्याने सशस्त्र संपर्क करावा पण धर्माचा मार्ग सोडू नये. अशी गौतमाची शिकवण होती.

काश्‍मीरचा इतिहास सांगणारा कल्हनाचा ‘गजतरंगिनी’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथाच्या लेखकावर गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा खोल असा प्रभाव होता. काश्‍मीरात सातत्याने राजा व प्रजा यांच्यात संघर्ष उभे राहिले. या संघर्षात लोकांच्या बाजूने उभा राहात काश्मिरमधील ब्राह्मण मरणात उपोषणाचा मार्ग अवलंबित असत. जर सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर ते आत्मदहनाचा मार्ग स्वीकारत असत. अन्याय व्यवस्थेविरुद्ध हिंसेचा मार्ग अपवादात्मक परिस्थितीत स्वीकारावा लागतो. विजयराज नावाच्या तरुणाने अन्याय करणार्‍या जुल्मी मंत्र्यास ठार मारण्याचा निर्णय घेतला. त्याचे समर्थन करताना तो आपल्या भावास म्हणाला की, आपण स्वत: अहिंसेचे पुरस्कर्ते आहोत पण अपवादात्मक परिस्थितीत हिंसा करावी लागते. मंत्र्यांच्या धोरणामुळे सर्वसाधारण जनतेस फार त्रास होत आहे. मंत्र्यामुळे अनेक लोकांचे प्राण जात आहेत. त्यामुळे स्वत:चे प्राण अर्पण करुन त्यांना वाचवण्याचा त्याचा विचार आहे. सार्वजनिक कल्याणासाठी अन्याय करणार्‍या लोकांस ठार मारावे लागते. महावीराने ड्रॅगनला याच कारणांसाठी ठार मारले. विजयराजने मंत्र्यास ठार मारले पण तो तेथून पळून गेला नाही. राजाच्या शिपायांशी युद्ध करीत त्याने प्राणापर्ण केले. त्याच्या दंडास बांधलेल्या चिठठीवर गीतेतील एक श्‍लोक होता - "यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानाय धर्मस्य संभवामि युगे युगे॥" आपण अन्यायास नष्ट करण्यासाठी आत्मबलिदान करीत आहोत व त्यामागे एक तीव्र अशी नैतिक प्रेरणा आहे. असेच विजयराजला याबाबत सांगायचे होते.

 

विद्रोहवादी तत्त्वज्ञानाचा मध्ययुगीन वटवृक्ष महात्मा बसवेश्‍वर

डॉ. सूर्यकांत घुगरे
झाडबुके कॉलेज, बार्शी

महात्मा बसवेश्‍वर हे आद्य समाजसुधारक होत. महात्मा बसवेश्‍वर हे कर्त्या समाजसुधारकांच्या प्रभावळीतील पहिले नाव होय. मध्ययुगाच्या १२ व्या शतकातील ११०५ - ११६७ हा त्यांचा जीवनकाल होय. बसवेश्‍वर हे सामान्यत: ‘महात्मा बसवेश्‍वर’ म्हणून ओळखले जातात. संपूर्ण कर्नाटकमध्ये ‘जगत्‌ज्योति बसवेश्‍वर’ म्हणून ते विशेष परिचित आहेत. महात्मा बसवेश्‍वर हे लिंगायत धर्माचे प्रेषित होत. कर्नाटकातील कल्याण राज्याचे ते पंतप्रधानही होते. समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, राजकारण व साहित्यकारण हे त्यांच्या विविधांगी स्वरुपाच्या विचार- कार्यांचे काही प्रमुख अंग होत. महात्मा बसवेश्‍वराचे विद्रोहवादी तत्त्वज्ञान समजावून घेणे हा प्रस्तुत शोधनिबंधाचा उद्देश होय.

‘विद्रोह’ ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. विद्रोह हा एक दृष्टिकोण आहे. विद्रोह ही प्रतिगामी विचारांना, मूल्यांना व गोष्टींना विरोध करुन पुरोगामी विचारांची प्रचिती घडविणारी एक सामाजिक शक्ती आहे. विद्रोह हा एक सामाजिक विचार, सामाजिक चळवळ व परिवर्तनवादी वर्तनप्रणाली आहे. विद्रोही अथवा विद्रोहवादी तत्त्वज्ञान हा तत्त्वज्ञानाचा एक प्रकार होय. प्रस्थापित मूल्यांच्या संदर्भातील विद्रोहवादी विचारांचे शोधन, प्रतिपादन आणि समर्थन या तत्त्वज्ञानातून होते ते विद्रोही तत्त्वज्ञान होय. विद्रोही तत्त्वज्ञानसुद्धा खूप व्यापक, समृद्ध व प्रभावी बनले आहे.
भारतीय विद्रोही तत्त्वज्ञानाला एक राष्ट्रीय परिमाण लाभलेले आहे. विद्रोही तत्त्वज्ञान हे सर्व भाषांतील साहित्याचे एक प्रमुख अंग बनले आहे. अलीकडे तर विद्रोहवादी तत्त्वज्ञानाला एक रचनात्मक, संस्थात्मक तसेच प्रभावी स्वरुपाच्या चळवळीचे अधिष्ठान लाभले आहे. सर्वांनीच दखल घ्यावी अशी एक सामान्य स्थिती या विद्रोही तत्त्वज्ञानाबाबत निर्माण झालेली आहे.

महात्मा बसवेश्‍वरांच्या विद्रोही तत्त्वज्ञाच्या अनेक पैलूंचा विचार प्रस्तुत शोधनिबंधात केलेला आहे. वेद प्रामाण्यतेचा अस्वीकार, मंदिरमाहात्म्य व पौरोहित्यशाही यावर आघात, बहुदेव उपासनेचा निषेध, यज्ञप्रणित विधींना विरोध, जातिविषमतेस विरोध, स्वर्ग आणि नरक संबंधाच्या अमूर्त व अभौतिक विचारांना विरोध, संस्कृत महात्म्याचा अस्वीकार, धर्मव्यवस्थेतील दोष, संस्कृतीतील विसंगती, समाजव्यवस्थेतील उणिवा, अंधश्रद्धांना विरोध, श्रमश्रेष्ठतावादाचे समर्थन यासारख्या बर्‍याच गोष्टींबाबत महात्मा बसवेश्‍वरांनी आपली वचने, जीवन व कार्य यातून पुरोगामी व परिवर्तनवादी तत्त्वज्ञान मांडलेले आहे. एकंदरीत पाहता भारतीय विद्रोही तत्त्वज्ञानाला महात्मा बसवेश्‍वरांचे लाभलेले योगदान हे अनेक दृष्टींनी मूलगामी आणि दूरगामी ठरले आहे. महात्मा बसवेश्‍वर म्हणजे विद्रोहवादी तत्त्वज्ञानाचा जणू मध्ययुगीन वटवृक्ष होय.