प्रा श्रीनिवास दीक्षित : भावपुर्ण आदरांजली

प्रा श्रीनिवास हरी दीक्षित यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी पुणे येथे त्यांच्या चिरंजीवांच्या घरी दि. ३ ऑक्टोबर २०१३ रोजी निधन झाले.प्रा दीक्षित हे त‍त्वज्ञान विषयाचे गाढॅ अभ्यासक म्हणून महाराष्ट्राला परिचित होते. डिसेंबर १९२० या दिवशी निपाणीजवळील बुदलमुख या गांवी त्यांचा जन्म झाला.हे गाव तत्कालीन मुंबई प्रांतातले. प्रांतरचनेमुळे ते आता कर्नाटकात गेले आहे.

शिक्षणासाठी म्हणून ते कोल्हापूरात आले आणि कायमचे कोल्हापूरचे रहिवसी झाले.कोल्हापूरातील राजाराम हायस्कुलमध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले.ह्या काळात दत्ता शिंदे(जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी)यशवंत चव्हाण(लाल निशाण पक्षाचे जेष्ठ नेते)कालवश बापूसाहेब पाटील(दलितमित्र कोल्हापूर व महाराष्ट्रातील अनेक सामाजिक चळवळीचे धुरंदर नेते)हे त्यांचे वर्ग मित्र होते.नंतर त्यांनी राजाराम कॉलेजमध्ये महाविद्यालयिन शिक्षण पुर्ण केले.त्या काळात राजाराम कॉलेज हे अत्यंत नावारुपाला आलेले कॉलेजहोते.अनेक खात्यनाम प्राध्यापक तेथे काम करत होते.पदवी व पदव्युत्तर पातळीवरील अनेक विषय शिकण्याची सुविधा त्या कॉलेजमध्ये उपलब्ध होती.

श्रीनिवास दीक्षितांना त‍त्वज्ञान विषयात अधिक रुचि निर्माण झाली.त्याचे कारण हि त‍त्वज्ञान शिकविणारे प्राध्यापकच होते.प्रा.एम.ए.निकम व प्रा.ना.सि.फडके हे दोघे त‍त्वज्ञान विषय शिकवत असत.दोघेही ख्यातनाम प्राध्यापक होते.विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल खूप आदरभाव आढळून येत असे.पैकी प्राध्यापक निकम हे केंब्रिजमध्ये शिकलेले.प्रा.ना.सि.फडके हे त्यांच्या शिकविण्याच्या शैलीबद्दल आणि वकॄत्वाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होते.श्रीनिवास दीक्षित हे त्यांचे अत्यंत लाडके विद्यार्थि होते.बी.ए आणि एम.ए ला त्यांनी त‍त्वज्ञान विषय निवडला.एम.ए च्या परीक्षेत मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले.आणि "तेलंग गोल्ड मेडल" चे ते मानकरी ठरले.

एम.ए झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे सावंतवाडी व धारवाड येथील महाविद्यालयांमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले.त्यानंतर कोल्हापूरा्तील राजाराम महाविद्यालयांमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले.त्यानंतर कोल्हापूरा्तीलमहाविद्यालयात राजाराम महाविद्यालयात ते रुजू झाले आणि इ.स.१९७९ अखेर तेथेच त‍त्वज्ञान विभाग प्रमुख म्हणुन त्यांनी काम केले.सरकारी महाविद्यालयातून सेवामुक्त झाल्यानंतर त‍त्वज्ञान विषयामध्ये विविध अंगोपांगाच्या व शाखांच्या संशोधनात ते रममाण झाले.व्याख्यान,चर्चासत्रे यांतील त्यांचा सहभाग वाढू लागला.

इंडियन फिलॉसॉफिकल कॉग्रेस,इंडिया फिलॉसॉफिकल असोसिएशन यासारख्या त‍त्वज्ञान विषयाला वाहिलेल्या संस्थांचे ते आजीव सभासद होते.१९६४ साली पन्हाळा येथे इंडियन फिलॉसॉफिकल असोसिएशनचे अधिवेशन त्यांनी आयोजित केले होते.त्यावर्षी मी राजाराम कॉलेज एम.ए च्या वर्गात शिकत होतो आणि कॉलेजमधील फिलॉसॉफि असोसिएशनचा सेक्रेटरी होतो.या नात्याने पन्हाळा येथिल अधिवेशनात जरुर ती सर्व कामे मी अत्यंत उस्ताहाने करीत होतो.या अधिवेशनामध्ये प्रा.दि.य.देशपांडे,प्रा.मे.पु.रेगे,प्रा.के.जे.शहा यांच्यासारखी दिग्गज मंडळी उपस्थित होती.त्यांचे विचार ऎकायला मिळणे ही एक बौध्दिक मेजवानी होती.प्रा.रेगे हे ए.जे.एअर यांच्या निमंत्रणावरुन इंग्लन्डला जाऊन आले होते.त्यांच्या विचाराने मी प्रभावित झालो.त्यांच्या-माझ्यात एक जवळकिचे जे नाते निर्माण झाले ते त्यांच्या जीवनाच्या अखेरपर्यंत टिकले.१९६९ साली धारवाड येथे भरलेल्या इंडियन फिलॉसॉफिकल कॉग्रेसमध्ये ते नीतिशास्त्र व सामाजिक त‍त्वज्ञान या विभागाचे अध्यक्ष होते.समोर श्रोत्यांमध्ये मी व प्रा.एस.एन.पाटील उपस्थित होतो.

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे ते उद्‌गाते होत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेची वाटचाल १९८० साली सुरु झाली ती आजतागायत सुरु आहे. परिषदेचे पहिले अध्यक्ष प्रा.दि.य.देशपांडे होते.त्यांच्यानंतर दुसरे अध्यक्ष प्रा.दीक्षित हे होते.१९८४ व १९९७ साली परिषदेची दोन अधिवेशने (म्हणजे पहिले व चौदावे अधिवेशन)कोल्हापुरात आयोजिली होती.ह्या दोन्ही अधिवेशनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.२००८ सालच्या रौप्यमहौस्तव अधिवेशनावेळी त्यांची शरिप्रकृती त्यांना साथ देत नव्हती.त्यामुळे इच्छा असूनही ते या अधिवेशनात सहभागी होऊ शकले नाही.

पाश्यात व भारतीय तत्त्वज्ञानाचा त्यांना व्यासंग खूप सखोल व सर्वांगिण असा होता.ह्या दोन्हीतील मूळ ग्रंथाचा त्यांनी अभ्यास केला होता.मानवी जीवनाचे भरण-पोषण कोणत्या प्रकारे शकेल याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे.’भारतीय तत्त्वज्ञान’ हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ याची साक्ष देणारा आहे.ह्या ग्रंथातील मराठी भाषा,तिचे सौष्ठव,पाहिले कि त्याची प्रचिती सामान्य वाचकालाही येऊ शकेल.अत्यंत सोपी भाषा,सुबोध विवेचन आणि सरळ व सुस्पष्ट निवेदन ही त्यांची वैशिष्टे होत.महाराष्ट्र शासनाने तीन वेळा ’उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार’ देऊन या ग्रंथाचा गौरव केला आहे.मराठी ही आपली मतृभाषा.तेंव्हा मराठीतून त‍त्वज्ञान विषयावरील ग्रंथलेखन होणे जरुरीचे आहे,असे त्यांचे म्हणणे होते.’नीतिमीमांसा’ व ’इ.स.१९०० पासूनचा नीतिविचार’ ही त्यांनी लिहिलेली पुस्तके अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.

’नीतिमीमांसा’ या ग्रंथात विविध नैतिक नीतिउतप्पत्तींचा विश्लेषनात्मक आढावा त्यांनी घेतला आहे.’इ.स.१९०० पासूनचा नितीविचार’म्हणजे मेरी वॉर्नाक यांच्या ’म्जीपबे पदबम १९००’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठीत केलेला सुबॊध अनुवाद आहे.ही दोन्ही पुस्तके मुळातूनच वाचावित इतकी ती सरस आहेत.अकरावी व बारावीच्या तत्त्वज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमाला धरुन त्यांनी पुस्तके लिहीली.महाराष्ट्र सर्वच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना ती पुस्तके अत्यंत उपयुत्क ठरली.त्यांनी मोजकेच ग्रंथ लिहीले.तथापि साक्षेपी विवेचनाची शैली हे त्यांच्या लेखनाची वैशिष्टय होते.प्रथम ते एखादी संकल्पना सविस्तरपणे मांडायचे,त्या पाठोपाठ त्यावर विरोधकांनी घेतलेले आक्षेप सांगत असत.नंतर त्या आक्षेपांना दिलेल्या उत्तरांचा ते परामर्श घेत असत.जशी त्यांची शिकवण्याची पध्दती होती तशीच त्यांची लेखनाची शैली होती.

त्यांचे कोणतेही पुस्तक वाचतांना विचाराला चालना मिळते,असा माझा(आणि इतरांचाही)अनुभव आहे.स्वत:ची मते स्पष्ट व परखडपणे ते मांडीत असत.अर्थात तत्त्वज्ञानामध्ये कोणत्याही विचाराबद्धल मतभेद असतात.प्रा.दीक्षितांच्या ठिकाणी स्वमताबद्धल अभिनिवेश अथवा दुराग्रह कधीच आढळत नसे.नीतिच्या प्रांतात ते स्वत: काण्टच्या नीतिनियमांनुसार आचरण करीत असत.तथापि आपले म्हणणे त्यांनी कोणावरही कधीही लादले नाही.ते नेहमीच अनाग्रही राहिले.कमालीची परमसहिष्णुता हे त्यांचे स्वभाव वैशिष्ठय होते.तात्त्विक चर्चेत ते नेहमीच रस घेत असत.त्यांची शरिरप्रकृती निरोगी आणि सौम्य होती.त्याप्रमाणे त्यांची मन:प्रवृत्ती सौम्य व सोशिक होती.ते स्वत: चिद्‍वादी(प्कमंसपेज) होते. तथापी भौतिकवादाचा हीरीरीने पुरस्कार करणार्‍या एखाद्या व्यक्तिबध्दल त्यांच्या मनात तिळमात्र वैर नव्हते.

एप्रिल,१९८० च्या ’नवभारत’ मासिकात त्यानी ’हिंदुत्ववाद’ ह्या शिर्षकाचा एक लेख त्यांनी लिहीला आणि महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात एक खळबळ माजली.अनेकांनी त्यांच्यावर टीका केली.त्याला उत्तर म्हणून आणखी एक लेख लिहीला.कोणत्याही अर्थाने आक्रमक भाषेत हे लेख नव्हते महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारांच्या आधारावर त्या लेखांची मांडणी आधारित होती.राज्यसंस्था व राजकारणाला दूर ठेवून केवळ संस्कॄतीच्या आधारावर राष्ट्र निर्माण करता येणे शक्य आहे,या भूमिकेवरुन सुत्ररुपाने त्यांनी मांडणी केली ही उच्च तात्त्विक भूमिका फारशी न समजल्याने त्यांच्यावर टीका झाली.टीकाकारांचे म्हणजे हे की ’राष्ट्र’ आणि ’राष्ट्रवाद’ ह्या संक्लपनाच मुळी राजकीय आहेत आणि त्यांना विशिष्ट भूप्रदेशाची आवश्यकता असते.त्याशिवाय ’राष्ट्र’ अस्तित्वात येऊ शकणार नाही.एवढय़ा गदारोळानंतरही प्रा.दीक्षितांनी स्वत:चे स्थैर्य ढळू दिले नाही.हे सर्व मी स्वत: अनुभवले आहे.कारण मी देखील त्यांच्याशी विरोधी अंगाने प्रत्यक्ष त्यांच्या घरी संवाद साधला होता.गीतेत वर्णिलेली स्थितप्रज्ञावस्था म्हणावयाची ती हीच असावी

प्रा.दीक्षित तत्त्वज्ञानाकडे केवळ एक बौध्दिक अथवा वैचारिक समाधान ह्या दॄष्टिने पाहात नव्हते.तत्त्वज्ञान(मग ते कोणतेही असो)हे बौध्दिक कसोटिवर खरे ठरलेच पाहिजे,हे निर्विवाद आहे,परंतु ते मानवी जीवनाचे अधिष्ठानही असले पाहीजे.तत्त्वज्ञान म्हणजे निव्वळ घट-पट,द्रव्य,गुण इ. संबंधीची चर्चा अशी त्यांची भूमिका नव्हती.तत्त्वज्ञा्नाने मानवी जिवनाचे भरण-पोषण कसे होईल,ही बाब त्यांच्या दॄष्टिने महत्त्वपूर्ण होती. तत्त्वज्ञान हे जीवनदर्शन असावयास हवे.तत्त्वज्ञान आणि जीवन यांच्यात कांहीएक असावयास हवा.ह्या अर्थाने विचार करु गेल्यास प्रा.निवास दीक्षित हे भारतीय परंपरेला अनुसरणारे एक दार्शनिक होते.विविध ग्रंथाच्या अभ्यासाने आणि चिंतनाने त्यांची ही भूमिका बनली होती.मानवी जीवनात नीतिला अनन्यसाधारण महत्त्व आहे.मनुष्याचे जीवन कृतार्थ व्हावे,ही भूमिका त्यांनी आयुष्यभर जपली,जोपासली आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी ती शिकविली.इंग्रजी,मराठी आणि संस्कॄत अशा तीन भाषा त्यांना अवगत होत्या.विविध नियतकालिकात इंग्रजी आणि मराठीतून अनेकविविध विषयांवर त्यांनी लेखन केले.वाई येथील प्राज्ञ पाठशाळेशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता.तेथे होणाऱ्य़ शिबीरांमध्ये ते नेहमीच उपस्थित राहायचे.

आयुष्यभर त्यांनी ज्ञानसाधना केली.नीतिमीमांसा जशी केली त्याचप्रमाणे स्वत:च्या जीवनात नीतिविवेकाची जपणुकही केली.जाणीवपुर्वक कोणालाही त्यांनी दु:ख दिले नाही.प्रसिध्दिपेक्षा कर्तव्यास त्यांनी अधिक महत्त्व दिले.अधिकाचा हव्यास त्यांना नव्हता.साधे सरळ आणि विचाराने परिप्लुत असे जीवन ते जगले.कोल्हापुरवर त्यांचे खूप प्रेम होते.शरिर थकले,अशक्तपणा वाढला म्हणूनच ते चि.दिलीपच्या घरी सपत्नीक गेले.एखादा दिवस कोल्हापूरला यायचे,पण पुन्हा पुण्याकडॆ प्रयाण करायचे.आता ते कोल्हापूरला कधीच येणार नाहीत.असे हे आमचे दार्शनिक गुरुवर्य प्रा.निवास दीक्षित आता देहरुपाने अस्तित्त्वात नसले तरी ग्रंथरुपाने आमच्याशी सतत संवाद साधत राहतील.तरुण व नव्या दम्याच्या तत्त्वज्ञान विषयाच्या प्राध्यापकांनी स्वत: पुढाकार घेवून प्रा. दीक्षितप्रमाणे ज्ञानसाधनेला वाहून घेतले आणि नितीविचारांची आपल्या एकूणच जीवनात पुन:प्रतिष्ठापना केली ,तर आपले जीवन निश्चितच एक नैतिक उंची गाठू शकेल.ती प्रा. दीक्षितांच्या स्मृतिला विनम्र व भावपूर्ण आदरांजली ठरेल.

 डॉ.ज.रा.दाभोळे,              
संस्थापक सदस्य व अध्यक्ष
महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषेद.